केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक उद्या रविवार दिनांक २३ मे रोजी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षण मंत्री तसेच सचिवांसोबत महत्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत देशातील इयत्ता १२ वीच्या परीक्षांबाबत चर्चा केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता इयत्ता १२ वीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही? असा पेच शिक्षण विभागापुढे आहे. त्यामुळे याबाबत उद्याच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. इयत्ता १२ वीच्या परीक्षांसोबतच इतर स्पर्धा परीक्षांच्या प्रवेश परीक्षांबाबतही बैठकीत चर्चा होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री पोखरियाल यांनी ट्विट करुन उद्याच्या बैठकीची माहिती दिली आहे. देशातील सर्व राज्यांच्या शिक्षण मंत्री आणि सचिवांसोबत व्हर्च्युअल बैठक घेतली जाणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटमध्ये दिली आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. रमेश पोखरियाल यांच्यासोबतच बैठकीला महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी तसेच केंद्रीय सूचना आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर देखील उपस्थित असणार आहेत.
इयत्ता १२ वीच्या परीक्षांचे काय होणार?कोरोना प्रादुर्भावामुळे देशात इयत्ता १२ वीच्या परीक्षा अद्याप घेण्यात आलेल्या नाहीत. तसेच अनेक स्पर्धा परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याच महत्वाच्या विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे. दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी याआधीच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून शालेय शिक्षण, शिक्षण मंत्रालय तसेच सीबीएसई विद्यार्थी व शिक्षकांकडून सुरक्षेचा विचार करुन परीक्षा कशा घेता येतील यासंदर्भात विचार सुरू असल्याचं म्हटलं होतं.