- सीमा महांगडे मुंबई : शिक्षकी पेशासाठी बीएड अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये घट होत असल्याची ओरड ऐकू येत असताना, प्रत्यक्ष मात्र बीएड प्रवेशांत वाढ झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये बीएड अभ्यासक्रमाचे ८८ टक्के प्रवेश निश्चित झालेले असताना, यंदा त्यात वाढ होऊन ते ९२ टक्क्यांवर पोहोचले आहेत. यंदा बीएड प्रवेशाच्या कॅप प्रवेशाच्या २ हजार ५५७ जागा रिक्त राहिल्या आहेत.
उच्चशिक्षण विभागाची सीईटी सेलकडून होणारी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यंदा कॅप फेरीत बीएड प्रवेशाच्या राज्यात ३४ हजार ९६४ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ३२ हजार ४०७ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चिती केली आहे. या ३४ जागांसाठी ५२ हजार ४७६ विद्यार्थ्यांनी अर्जनोंदणी केली होती. त्यापैकी ९२ टक्के जागांवर प्रवेश झाले असून, ८ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत.
या आधी कला किंवा विज्ञान शाखेतील विद्यार्थी हे शिक्षकी पेशाकडे वळत होते. मात्र, आता बीएमएम, बीएससीआयटी, बीएमएस असे व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थीही बीएड प्रवेशांकडे वळू लागले आहेत. आयसीएससी, सीबीएसई, तसेच आंतरराष्ट्रीय मंडळाच्या शाळांमध्ये असणारी मागणी, तसेच होम स्कूलिंग आणि क्लासला आणि महत्त्व यामुळेही प्रवेशांत वाढ झाल्याचे काही प्राचार्यांनी सांगितले.