नवी दिल्ली : हुंडा घेण्याचे काय फायदे आहेत हे नर्सिंगच्या अभ्यासक्रमात शिकविले जातात हे ऐकून कोणीही चक्रावून जाईल, पण ती वस्तुस्थिती आहे. या अभ्यासक्रमात समाजशास्त्र या विषयासाठी टी. के. इंद्राणी लिखित पाठ्यपुस्तकामध्ये एका पानावर हुंड्याबद्दलची सर्व माहिती आहे. हुंड्यामुळे नवीन घर फर्निचर, रेफ्रिजरेटर वगैरे उपकरणांनी सुसज्ज करता येते, असेही या पुस्तकात म्हटले आहे.
या पाठपुस्तकात हुंड्याच्या फायद्यांविषयी ज्या पानावर माहिती दिली आहे, ते पान सोशल मीडियावर झळकले आहे. शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही हे पान आपल्या सोशल मीडिया खात्यावर शेअर केले आहे. अशा प्रकारची पाठ्यपुस्तके अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात यावीत, अशी मागणी चतुर्वेदी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली आहे. इंडियन नर्सिंग कौन्सिलने निश्चित केलेल्या अभ्यासक्रमानुसार हे पुस्तक लिहिण्यात आल्याचा उल्लेख त्याच्या कव्हरवर आहे. मुलींना हुंड्यामध्ये पालकांच्या मालमत्तेतील वाटा दिला जातो. हुंडा प्रथेचा हा फायदा आहे असे या पाठ्यपुस्तकात म्हटले आहे.
हुंड्याच्या अन्यायकारक प्रथेवर देशात कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. हुंडा मिळण्यासाठी महिलांना छळले जाते, प्रसंगी त्यांची हत्या केली जाते. हुंड्याच्या मागणीला कंटाळून काही महिला आत्महत्याही करतात. अशा गोष्टी घडत असताना हुंडापद्धतीचे उदात्तीकरण करणे अतिशय चुकीचे आहे, असे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले. (वृत्तसंस्था)
‘कुरूप मुलींचे विवाह होऊ शकतात हुंड्यामुळे!’‘टेक्स्टबुक ऑफ सोशिऑलॉजी फॉर नर्सेस’ असे शीर्षक असलेल्या पाठ्यपुस्तकात हुंड्याचे फायदे या शीर्षकाखाली वादग्रस्त विधाने केली आहेत. मोठा हुुंडा देण्याची तयारी असल्यास कुरूप मुलीचा विवाह सुस्वरुप किंवा कुरूप मुलाशी होऊ शकतो असे त्या पुस्तकात म्हटले आहे. हुंडा पद्धतीचा एक अप्रत्यक्ष फायदा म्हणजे पालक आपल्या मुलींना उच्च शिक्षण देऊ लागले आहेत. मुली जास्त शिकलेल्या असल्या म्हणजे कमी हुंडा द्यावा लागतो असे विधानही या पाठ्यपुस्तकात आहे.