मुंबई : शिक्षण मंडळाकडून वेळापत्रक जाहीर झालेले असताना दहावी, बारावीच्या परीक्षा आणखी एक महिना पुढे ढकलणे हितावह ठरणार नसल्याचे मत राज्य शाळा मुख्याध्यापक संघाकडून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्रे लिहिली असून दहावी, बारावीच्या परीक्षा या नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच घेण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी शिक्षणाधिकारी, बोर्डाचे पदाधिकारी यांच्यासमवेत ऑनलाईन बैठक घेत दहावी, बारावी परीक्षांच्या आयोजनाचा आढावा घेतला. यादरम्यान अनेक विद्यार्थी, पालक पुरेशा सरावाअभावी परीक्षा पुढे ढकलव्यात, अशी मागणी करत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे शिक्षणाधिकारी आणि बोर्डाने दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलत येतात का? त्यांचा कालावधी कमी करता येतो का? याची चाचपणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा पुढे ढकलल्या जाणार असे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती मुख्याध्यापक संघाचे महेंद्र गणपुले यांनी दिली. अनेक ग्रामीण व शहरी भागातील दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा पुरेसा सराव आणि मनाची तयारी झाली असताना परीक्षा पुढे ढकलण्याचा घाट घालणे म्हणजे शैक्षणिक हिताच्या दृष्टीने घातक असल्याचे त्यांनी सांगितले. परीक्षांच्या नियोजनाचा आराखडा व पद्धती ऐनवेळी बदलणे शक्य नाहीच, पण ऐनपरीक्षांच्या तोंडावर विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परीक्षांबाबतीत काही धोरणात्मक निर्णय घ्यायचा झाल्यास आधी तो मंजूर करून घ्यावा आणि मगच ती माहिती प्रसिद्ध करावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
Education News:दहावी, बारावीच्या परीक्षा वेळापत्रकाप्रमाणेच घ्या! मुख्याध्यापक संघटनेसह, तज्ज्ञांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 9:35 AM