लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विद्यापीठाच्या विधि अभ्यासक्रमाच्या परीक्षांचा घोळ संपता संपेना आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तक्रारीही सुरूच आहेत. एलएलएम परीक्षा लांबणीवर पडली आणि त्याचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना मिळाले नाही. अशातच एलएलबीच्या ३ सत्र ४ च्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने, १८ मेपासून सुरू होत असताना अद्यापही विद्यार्थ्यांना प्रश्नसंच मिळाले असल्याने विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडून जाहीर होऊनही आणि परीक्षा अवघ्या आठवड्यावर येऊनही अद्याप प्रश्नसंच नसल्याने विद्यार्थी विद्यार्थ्यांकडून ते लवकरात लवकर मिळावेत, अशी मागणी ते करत आहेत.
राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा १ जून ते १५ जुलैदरम्यान ऑफलाईन पद्धतीने होतील, असे एकमत कुलगुरूंच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ठरले. मात्र, त्यानंतर विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ नये याकरिता मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच होतील, असे जाहीर करत स्पष्टीकरण दिले. त्याप्रमाणे एलएलबी परीक्षा १८ मेपासून ऑफलाईन पद्धतीने होत आहेत. एलएलबीच्या या आधीच्या तिन्ही सत्रांच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने झाल्या आहेत त्यामुळे हे सत्र ही ऑनलाईन पद्धतीने घेऊन शैक्षणिक वर्ष पूर्ण करावे, अशी मागणी विद्यार्थी करत होते. मात्र परीक्षा नियोजित पद्धतीने होतील हे विद्यापीठाने स्पष्ट केल्यानंतर किमान विद्यापीठाकडून प्रश्नसंच देणे अपेक्षित असल्याचे मत विद्यार्थी व्यक्त करत आहेत.
परीक्षा विभागाला परिपत्रकाचा विसर ऑफलाईन परीक्षांच्या बाबतीत प्रत्येक परीक्षेत किमान एका दिवसाचा गॅप असावा, विद्यार्थ्यांना या १५ मिनिटे वेळ जास्त दिला जावा तसेच विद्यार्थ्यांना प्रश्नसंच दिले जावेत, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्याप्रमाणे मुंबई विद्यापीठानेही परिपत्रक जाहीर केले. मात्र, परीक्षांसाठी प्रश्नसंच देण्यास परीक्षा विभाग विसरला की काय, असा प्रश्न स्टुडंट लॉ कौन्सिलचे सचिन पवार यांनी केला आहे.