लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘परीक्षा पे चर्चा’ या पंतप्रधानांसमवेत दिल्लीत होणाऱ्या चर्चेच्या कार्यक्रमात यंदा जास्तीत जास्त विद्यार्थी, पालकांना, शिक्षकांना सहभागी करून घेण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना, उपसंचालकांना यात व्यक्तिश: लक्ष घालण्यास सांगण्यात आले आहे.
या चर्चेत विद्यार्थ्यांना-शिक्षकांना, पालकांना सहभागी होता यावे यासाठी ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्न स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा १२ डिसेंबरपासून सुरू झाली असून १२ जानेवारीपर्यंत त्यात सहभागी होता येईल. त्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याच्या सूचना शालेय शिक्षण संचालनालयाने शाळांना दिल्या आहेत. त्यासाठी जाहिरात, सोशल मीडिया यांचा वापर करण्यास सांगण्यात आले आहेत. गेली सहा वर्षे सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात हा उपक्रम राबविला जात आहे. यात दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना थेट पंतप्रधानांशी संवाद साधता येतो. याकरिता विद्यार्थ्यांची, पालकांची, शिक्षकांची ऑनलाईन स्पर्धा घेतली जाते.
कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना प्रश्नही विचारता येतात. सहभागींना एनसीईआरटीकडून प्रमाणपत्र मिळते. यावर्षी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे, असा प्रयत्न आहे. त्यासाठी शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांना कामे नेमून देण्यात आली आहेत.
जबाबदारी काय असणार? शाळांनी पालकांना व्हॉट्स ॲप किंवा संकेतस्थळाच्या माध्यमातून सहभागी होण्याकरिता आवाहन करायचे आहे. त्याची माहिती शाळांना शिक्षण संचालनालयांना सादर करायची आहे. प्रसारमाध्यमांतूनही याची प्रसिद्धी करायची आहे. या कामावर देखरेख ठेवण्याचे काम शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.