लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (नॉन-क्रिमीलेअर-एनसीएल) काही तांत्रिक बाबींमुळे विद्यार्थी सादर करू न शकल्यास अशा विद्यार्थ्यांकडून हमीपत्र भरून घेण्यात यावे; तसेच विद्यार्थ्यांना एनसीएल प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात यावी, असे शालेय शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी विवेक सपकाळ यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एनसीएल प्रमाणपत्र मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
अकरावी अर्जाची अंतिम मुदतवाढ संपली असून, येत्या ३ ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होऊन विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा शिक्षण संचालनालय आणि उपसंचालक कार्यालयांकडून ही माहिती देण्यात आली आहे. अकरावी प्रवेशासाठी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (एनसीएल) उपलब्ध असल्यास विद्यार्थी ही प्रमाणपत्रे अपलोड करू शकतील. परंतु, अर्ज भरतेवेळी हे प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक करण्यात येऊ नये, विद्यार्थ्यांकडून हमीपत्र घेऊन त्यांना हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी द्यावा, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी परिपत्रकाद्वारे माहिती दिली.
एटीकेटी पात्र विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया कशी असेल?दहावीमध्ये एटीकेटीची सवलत मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी विशेष फेरीनंतर स्वतंत्र फेरीचे आयोजन करण्यात येईल. अशा विद्यार्थ्यांना विशेष फेऱ्यांनंतर अर्जाचा भाग एक भरणे तसेच विकल्प (अर्जाचा भाग दोन) भरण्याची सुविधा देण्यात येईल.
कोणती कागदपत्रे सादर करावीत? सर्व प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना जातीचा दाखला सादर करणे आवश्यक असेल. विद्यार्थ्यांचा स्वत:चा जातीचा दाखला अद्याप मिळाला नसल्यास वडिलांचा जातीचा दाखला ग्राह्य धरता येईल. ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. व्हीजे-एनटी, ओबीसी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जातीच्या दाखल्यासोबत उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे ‘नॉन-क्रिमीलेअर’ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही कारणाने एनसीएल प्रमाणपत्र मिळणारच नसेल अशा विद्यार्थ्यांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज भरणे योग्य आहे.