नवी दिल्ली – गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगासह भारतात कोरोनानं हाहाकार माजवला आहे. कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त परिणाम शिक्षण व्यवस्थेवर झाला आहे. मागील वर्षभर शाळा-कॉलेज सुरु नसल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिल. त्यातच दहावी-बारावीसारख्या बोर्डाच्या परीक्षाही न झाल्याने विद्यार्थ्यासह पालकांची चिंता वाढली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा न घेताच मागील मूल्यांकनाच्या आधारे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लावण्यात आला.
यातच कोरोना काळात पास झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागणार का? अशी चर्चा सुरू आहे. कोरोना काळात पास झालेल्यांच्या भविष्याबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. अशावेळी सोशल मीडियावर करण्यात आलेल्या एका दाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणखी खळबळ माजली आहे.
काय आहे या मेसेजमध्ये?
सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोसोबत एक मेसेज लिहिण्यात आला आहे त्यात म्हटलंय की, १० वी, १२ वीच्या वर्गात प्रमोट झालेल्यांनी लक्ष द्यावं. कोरोना काळातील १० वी आणि १२ वी विद्यार्थ्यांच्या निकालावर सरकारी नोकरीमध्ये मान्यता नसेल. यावर्षी परीक्षा न देता विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीमध्ये या विद्यार्थ्यांच्या मार्कशीट ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
परंतु सोशल मीडियात व्हायरल होणारा हा दावा खरा आहे का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो(PIB)च्या पडताळणी विभागाने तपासणी केली. PIB च्या फॅक्ट चेक विंगने या दाव्याची तपासणी केली. PIB फॅक्ट चेकबाबत पडताळणी केली. याबाबत PIB नं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर माहिती अपलोड केली आहे.
काय आहे सत्य?
पीआयबी(PIB) च्या ट्विटरनं या दाव्याची पडताळणी करत म्हटलं की, यंदा १० वी आणि १२ वी परीक्षेत प्रमोट झालेल्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीत ग्राह्य धरणार नाही हा दावा PIB Fact Check मध्ये खोटा असल्याचं निष्पन्न झालं आहे. केंद्र सरकारद्वारे अशाप्रकारे कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यामुळे कृपया असे बनावट फोटो आणि बातमी शेअर करू नका.
तुम्हीही एखादी बातमी करू शकता चेक?
विशेष म्हणजे, PIB फॅक्ट चेक केंद्र सरकारशी निगडीत धोरण आणि निर्णयाबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवण्यापासून रोखण्याचं काम करतं. PIB ही विंग सरकारी योजना, राष्ट्र आणि लोकांच्या हितासाठी दावे पडताळणी करतं. जर तुम्हालाही केंद्र सरकारच्या नीती आणि योजनांबाबत कुठल्याही दाव्याची पडताळणी करायची असेल तर PIB फॅक्ट चेकशी संपर्क साधू शकता. त्यासाठी तुम्हाला @PIBFactCheck ट्विटरवर, ८७९९७११२५९ यावर व्हॉट्सअप किंवा pibfactcheck@gmail.com वर संपर्क साधू शकता.