संतोष आंधळे
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: तुमच्या मुलाला जे. जे. मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घ्यायची असेल, तर डोनेशन द्या, आम्ही काम करून देतो, अशा भूलथापा देऊन पालकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार जे. जे. रुग्णालयात उघडकीस आला आहे. उल्लेखनीय म्हणजे हा सर्व गैरप्रकार रुग्णालय परिसरातील प्रशासकीय इमारतीत घडला आहे.
आपल्या पाल्याला मेडिकलला प्रवेश मिळावा, यासाठी अनेक पालक उत्सुक असतात. मात्र, केंद्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत (नीट) कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा मेडिकल प्रवेशाचा मार्ग खुंटतो. अशाच अस्वस्थ पालकांना हेरून त्यांच्या पाल्यांना कॉलेजच्या मॅनेजमेंट कोट्यातून जे. जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष चारजणांनी दाखवले. या प्रकाराला बळी पडलेल्या दहा ते १२ पालकांनी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांत धाव घेतली.
बनावट ई-मेल आयडी...
- मेडिकलला प्रवेश घेण्यास उत्सुक असलेली मुले व त्यांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना जे. जे. मेडिकल कॉलेजला प्रवेश हवा असल्यास डोनेशनद्वारे काम होऊ शकते, अशी हमी दिली जायची.
- पालक आणि पाल्याला रुग्णालयात बोलावले जायचे. त्यांच्याकडून जे. जे. च्या नावाचे डिमांड ड्राफ्ट्स घेतले जायचे.
- मग ही व्यक्ती पालकांना जे. जे. कर्मचारी म्हणून भासविणाऱ्या टोळीतील त्या व्यक्तीकडे घेऊन त्याला डिमांड ड्राफ्ट द्यायला सांगायची.
- त्यानंतर काही पालकांकडून २५ लाख रुपये घेतले जायचे.
- काही दिवसांत प्रवेश निश्चित झाल्याचा ई-मेल पाल्याच्या ई-मेल आयडीवर यायचा. त्यासाठी जे. जे. रुग्णालयाचा बनावट ई-मेल आयडीही तयार करण्यात आला होता.
- डोनेशनचे पैसे घेतल्यानंतर पालकांना अमक्या दिवशी तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन गुणवत्ता यादी बघा, असे सांगितले जायचे. या टप्प्यापर्यंत पैसे घेतलेल्या व्यक्तीचा आणि पालकांचा रीतसर संपर्क असायचा.
- कॉलेजात गेल्यानंतर पालकांना फसवणूक झाल्याचे लक्षात यायचे.
आरोपी कोण?
जे. जे. मार्ग पोलिसांनी विशाल चौधरी, अनिमेश त्रिपाठी, गणेश शिंदे, निखिल भोसले या चौघांविरोधात गुन्हा नोंदवून घेतला.
आमच्याकडे आतापर्यंत १०-१२ पालक अशा पद्धतीची फसवणूक झाली असल्याची तक्रार घेऊन आले आहेत. ज्या व्यक्तींची नावे तक्रारदार पालक सांगत आहेत त्यांचा आणि जे. जे. रुग्णालय प्रशासनाचा कोणताही संबंध नाही. या घटनेनंतर आम्ही प्रशासकीय इमारतीत अतिरिक्त सीसी टीव्ही लावले आहेत. - डॉ. गजानन चव्हाण, उपअधिष्ठाता, सर जे. जे. रुग्णालय.