लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेत फॉर्म नंबर १७ भरून खासगीरीत्या ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांचे १० ऑगस्ट आणि दहावीच्या खासगी विद्यार्थ्यांचे १४ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत.
दहावीच्या खासगी विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांमधून स्वीकारण्याची कार्यपद्धती मार्च २०२४ च्या परीक्षेपासून सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाने दिली आहे. दहावी-बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या फॉर्म नंबर १७ भरून परीक्षेस बसण्याची सुविधा राज्य शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचे सर्व कनिष्ठ महाविद्यालयातून नावनोंदणी अर्ज स्वीकारण्यात येतात.
वेळापत्रक बारावी - दहावी विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाइन भरणे : १० ऑगस्ट ते ११ सप्टेंबर, १४ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, ऑनलाइन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोहोच पावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या माध्यमिक शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात जमा करणे : १२ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर : १७ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, ऑनलाइन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोहोच पावतीची एक छायाप्रत, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करणे : १५ सप्टेंबर
फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी खासगीरीत्या फॉर्म नंबर १७ भरून नावनोंदणी अर्ज ऑनलाइन प्रक्रियेद्वारे भरून घेण्यात येणार आहेत. सर्व माध्यमिक शाळांनी याची नोंद घेऊन शिक्षण प्रवाहाच्या बाहेर राहिलेल्या, परंतु किमान पाचवी उत्तीर्ण असलेल्या मुला-मुलींना दहावीच्या परीक्षेस बसून शिक्षणाच्या प्रवाहात येण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, असे ओक यांनी सांगितले.