लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: राज्यातील व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी (एमबीए) अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश नोंदणीप्रक्रिया सुरू झाली असून सीईटी सेलकडून एमबीए आणि एमएमएस प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा ७ ऑक्टोबरपासून उपलब्ध झाली आहे. या अभ्यासक्रमाची तात्पुरती गुणवत्ता यादी १५ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. तर अंतिम गुणवत्ता यादी १९ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
एमबीए सीईटीच्या परीक्षेसाठी राज्यभरातील एक लाख तीन हजार ७४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. निकालाच्या महिन्याभरानंतर ही प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून यानुसार आता राज्यातील सरकारी, अनुदानित, विद्यापीठांतर्गत व्यवस्थापन संस्था, विद्यापीठांतर्गत व्यवस्थापन विभाग, विनाअनुदानित खासगी शैक्षणिक संस्थांमधील व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या (एमबीए/एमएमएस) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही प्रवेश प्रक्रिया पार पाडली आहे. या अभ्यासक्रमासाठी ‘एमएएच-एमबीए/एमएमएस-सीईटी’ परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही. परंतु अन्य प्रवेश परीक्षा दिलेले आणि सीईटीसाठी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना मात्र प्रवेश प्रक्रिया शुल्क भरावे लागणार आहे.
केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) तीन फेऱ्या होतील. त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादी १९ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असून, याच दिवशी पहिल्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर होईल.