सेतू अभ्यासक्रमातून १०० टक्के ऑनलाईन विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांची अध्ययन क्षमता जाणून घेणे शक्य आहे का? शिवाय जे विदयार्थी ऑफलाईन आहेत त्यांच्यापर्यंत सेतू अभ्यासक्रम पोचवायचा कसा ? सध्यस्थितीत राज्यातील शाळांतशिक्षकांची उपस्थिती ५० टक्के असताना ४५ दिवसांत सेतू अभ्यासक्रम विद्यर्थ्यांकडून पूर्ण करून घेणे शक्य आहे का ? प्रत्येक शाळेत जवळपास २५ टक्के मुलांकडे स्मार्टफोन नाहीत, मग सेतू अभ्यासक्रमाच्या जवळपास १५० ते २०० पानांची पुस्तके शिक्षण विभाग देणार नसेल तर शाळेने झेरॉक्स करून मुलांना देणे अपेक्षित आहे का ? त्याची आर्थिक तरतूद शाळा व पालक दोघांनी कशी करावी ? असे अनेक प्रश्न सध्यस्थितीत राज्यातील सर्वच शिक्षक व मुख्याध्यापकांपुढे आहेत. शाळा व मुखाध्यापकांकडून , संघटनांकडून येणाऱ्या या प्रश्नांच्या उत्तरांसाठी यांचे संकलन करून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांना (डायट) आयुक्तांना पाठविण्याची वेळ आली आहे.
मागील वर्षभर कोरोनामुळे शाळा बंद आहेत. दरम्यान अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याने उजळणीच्या माध्यमातून ते भरून काढण्यासाठी एससीईआरटीकडून सेतू अभ्यासक्रम (ब्रीज कोर्स) बनविण्यात आला असून शाळांना तो अंमलबजावणीसाठी पाठविण्यात आला आहे. मात्र तो कसा राबवायचा? विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहचवायचा? त्यासाठीच्या आर्थिक तरतुदीचे काय? पुढील नियोजित अभ्यासक्रमाचे काय? असे अनेक प्रश्न शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यासाठी अनुत्तरित आहेत, त्यामुळे त्याचा संभ्रम वाढला आहे. हे प्रश्न घेऊन ते जिल्ह्यातील डायट अधिकाऱ्यांकडे वारंवार जात असल्याने अखेर डायट अधिकाऱ्यांनीच या प्रश्नांचे संकलन करून आयुक्तांना मार्गदर्शनाची विनंती केली आहे.
सेतूवर प्रश्नचिन्ह सेतू अभ्यासक्रमात मागील इयत्तेची उजळणी आहे, दरम्यान त्या इयत्तांची पुस्तके विद्यार्थ्यांनी शाळेत जमा केल्याने आता उजळणीसाठी त्यांच्याकडे पुस्तके उपलब्ध नसल्याने सेतूच्या उजळणीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सध्यस्थितीत केवळ मराठी व हिंदी माध्यमाचा सेतू अभ्यासक्रम उपलब्ध असल्याने इतर माध्यमाच्या विद्यर्थ्यांपर्यन्त तो कधी आणि केव्हा पोहचणार , त्यांची अध्ययन निष्पत्ती केव्हा कळणार याबाबतीत प्रश्नचिन्ह शिक्षण अभ्यासकांनी उपस्थित केले आहे. सेतू अभ्यासक्रम केवळ पीडीएफ रूपात उपलब्ध असल्याने ऑफलाईन विदयार्थी यापासून वंचितच राहणार का , त्यांच्यासाठी काय उपाय योजना आहे याबद्दल स्पष्टता नाही. पीडीएफ रूपातील विषयनिहाय झेरॉक्स म्हणजे शाळा आणि पालक दोघांच्या खिशाला आर्थिक भुर्दड असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने सेतू संबंधित सुरुवातीला शाळेतील शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना स्पष्टता आणावी आणि मगच त्याची अमलबजावणी करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शिक्षकांचे सेतू बाबतीतील काही प्रश्न
- सेमी इंग्रजी आणि उर्दू माध्यमातील सेतू कधी उपलब्ध होणार ?
- सेतू अभ्यासक्रम पूर्ण क्रेपर्यंत पुढील अभ्यासक्रम घ्यायचा नाही तर आतापर्यंत शिकविले त्यात खंड पडणार नाही का ?
- ग्रामीण भागातील मुलांकडे दिवसभर म्बील नसल्याने त्यांच्या ऑनलाईन शिक्षणात अडचणी येतात , मग सेतू ची उजळणी कशी करून घ्यावी ?
- ४५ दिवसांच्या सेतू अभ्यासक्रमात अनेक सुट्ट्या आहेत , त्यामध्ये अभ्यासक्रम उजळणी होणार नाही मग ४५ दिवस पूर्ण होणार कसे ?
- पीडीएफच्या झेरॉक्सच्या नावाखाली पालकांना आर्थिक भुर्दड बसत आहे त्यावर काय उपाय ?