अयोध्या : अयोध्येत शरयू नदीच्या घाटावर एका झाडाखाली काही मुले पाटी पेन्सिल घेऊन बसली आहेत. त्यांना एक पोलीस उपनिरीक्षक इंग्रजी, गणित, हिंदी हे विषय शिकवतानाचे दृश्य सध्या नेहमी दिसते. कार्यालयीन काम संपल्यावर पोलीस उपनिरीक्षक रणजीत यादव विद्यादानाचे समाजसेवी काम करतात. अयोध्येतील अनाथ मुलांना साक्षर करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. त्यामुळे यादव यांना वर्दीवाले गुरुजी म्हणून ओळखले जाते.
उत्तर प्रदेशमधील २०१५ च्या तुकडीचे पोलीस उपनिरीक्षक असलेले रणजीत यादव यांची नियुक्ती अयोध्या येथे पोलीस उपमहानिरीक्षकांच्या कार्यालयात झाली आहे. यादव यांच्याकडे जी मुले शिकतात, त्यात महक ही १२ वर्षे वयाची अनाथ मुलगीही आहे. तिने सांगितले की, पोलीस अधिकारी असलेले रणजीत यादव मला मारतील अशी पूर्वी भीती वाटत असे. पण आता त्यांच्याकडून विविध विषय शिकताना छान वाटते. यादव यांना अनेक मुले शरयू किनारी भीक मागताना आढळली. त्यांच्या पालकांशी त्यांनी संवाद साधला. मुलांना माझ्याकडे शिकायला पाठवा, अशी यादव यांनी केलेली विनंती पालकांनी मान्य केली. (वृत्तसंस्था)
अपना स्कूलमध्ये सध्या ६० विद्यार्थीरणजीत यादव यांनी सांगितले की, अपना स्कूल या उपक्रमाला सप्टेंबर २०२१ मध्ये सुरुवात झाली. प्रारंभी शरयू नदीच्या घाटांवर राहाणारे लोक मुलांना अपना स्कूलमध्ये पाठविण्यास आधी फार उत्सुक नव्हते. पण नंतर या मुलांनाच शिक्षणाची गोडी लागली. ही शाळा दररोज सकाळी सात ते नऊ या वेळेत भरते. सध्या या शाळेत ६० मुले शिकत आहेत. पोलीस सेवेतील कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन फावल्या वेळात मी विद्यादानाचे काम करीत आहे, असे रणजीत यादव यांनी आवर्जून सांगितले.