चंदीगड – देशात कोरोनाचं संकट आल्यापासून सगळीकडे लॉकडाऊन सुरू झालं, या लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवहार ठप्प झाले तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षही रखडलं, गेल्या मार्चपासून देशभरात शाळा बंद करण्यात आल्या होत्या, अलीकडे काही राज्यांनी शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. परंतु कोरोनाच्या दहशतीमुळे अद्यापही पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी तयार नाहीत.
यातच कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय समोर आला, घरात बसून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळू लागलं, त्यात इंटरनेट आणि मोबाईलचा अभावही दिसून आला, हरियाणा सरकारने पुढील शैक्षणिक वर्ष सुरु करण्यापूर्वी सरकारी शाळेतील ८ वी ते १२ वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत टॅब देण्याची योजना आणली आहे. शिक्षण साहित्य आणि पुस्तकांसह प्री कंटेट असलेले ८ लाख २० हजार टॅब वितरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षण क्षमतेत सुधारणा येईल.
विद्यार्थी वर्गाच्या बाहेर, घरून ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतात. मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला शिक्षणमंत्री कंवर पाल बाहेर असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत. या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की, हे सर्व टॅब विद्यार्थ्यांना लायब्रेरीच्या पुस्तकाप्रमाणे वितरित केले जातील, जे १० वी आणि १२ वीच्या परीक्षेनंतर पुन्हा परत घेतले जातील. विद्यार्थ्यांना या टॅबच्या माध्यमातून आधुनिक शिक्षण मिळेल.
टॅबमध्ये ऑनलाईन शैक्षणिक साहित्य, पीडीएफ पुस्तके, क्यूआर कोड एनसीईआरटी साहित्य, व्हिडीओ, शिक्षकांद्वारे केलेले व्हिडीओ, प्रश्नमंजुषा, राष्ट्रीय पात्रतेसाठी नीट, जेईई, एनडीए आणि राष्ट्रीय शिक्षक परीक्षा एनटीई सारख्या स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीबाबतची सर्व साहित्य उपलब्ध असेल. सर्व शैक्षणिक साहित्याचा एनक्रिप्टेड डेटा प्री लोड केला जाईल. ज्यात विद्यार्थी अभ्यास करून मॉक टेस्ट देऊ शकतील. त्याचसोबत पुढील परीक्षांच्या तयारीसाठी मागील वर्षीचा पेपरही पाहू शकतात.
मुख्यमंत्री मनोहर लाल म्हणाले की, या टॅबचा योग्यरित्या वापर होण्यासाठी टॅबमध्ये मोबाईल डिवाइस(एमडीएम) अपलोड केला जाईल. एमडीएम प्रत्येक विद्यार्थ्यांच्या डिवाईसचा उपयोग लॉग इन न करताही डिवाइस ट्रेकिंग ठेवला जाईल. टॅबची विक्री केली जाऊ नये, यासाठी योग्य खबरदारी घेतली जाईल. विद्यार्थी फक्त स्वत:च्या शैक्षणिक वापरासाठी या टॅबचा वापर करतील आणि कोणत्याही इतर वेबसाईटचा वापर करू शकणार नाहीत किंवा अन्य कोणतीही गोष्ट डाऊनलोड करता येणार नाही असंही त्यांनी सांगितले.