विवेक पंडित, अध्यक्ष, विद्या निकेतन, डोंबिवली उद्याच्या भारताचे नागरिक घडविण्याचे काम शाळा करत असतात. आपल्या हातून उत्तम नागरिक घडावा, यासाठी प्रत्येक शिक्षक आटोकाट प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपल्या विषयाचा अभ्यास विद्यार्थ्याने मनापासून करावा, अशी इच्छा शिक्षकांनी बाळगणे अगदी रास्तच आहे. त्या अनुषंगाने गृहपाठाचा आग्रह धरला जातो. मात्र, हल्लीच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच इतरही क्षेत्रांत चमकण्यासाठी अनेक संधी उपलब्ध असतात. अशावेळी विद्यार्थ्यांना गृहपाठ देणे योग्य की अयोग्य, याचा ऊहापोह होणे ही सध्याची गरज आहेच.
अंतिमत: फायदा विद्यार्थ्यालाचशाळेत एकाच दिवशी एखादा धडा पूर्ण शिकवला जातोच, असे नाही. गृहपाठ करून आलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या दिवशी शाळेत संबंधित विषयाचा तोच धडा समजून घेण्यास कमी अडचणी येतात. किंबहुना गृहपाठ केला असल्याने त्यांना धडा अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होते. अंतिमत: त्याचा फायदा विद्यार्थ्यालाच होतो.
अतिरेक नकोच...विद्यार्थ्यांना गृहपाठ देतेवेळी त्याचा अतिरेक होणार नाही, याचे भान बाळगले जायला हवे. गृहपाठ आटोपशीर दिला जावा. कारण अभ्यासाच्या दबावाखाली मुलांचे बालपण दबून जायला नको. त्यामुळे कमी गृहपाठ असल्यास मुलांना खेळ वा अन्य छंद जोपासता येतील. अन्यथा गृहपाठाच्या ओझ्याखाली त्यांच्यातील खेळकर, खोडकरपणा विझून जाईल आणि त्यातून देशाचेच नुकसान होईल.
स्व-अभ्यासाची मुळे घट्ट रुजतात...शाळेतून घरी परतल्यावर विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे काहीसे कमी होते. मात्र, शाळेत दिवसभरात आपण काय शिकलो, याची उजळणी वा लसावि म्हणजे गृहपाठ होय. विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला जाणे केव्हाही योग्यच. कारण त्यामुळे घरी लिखाणाची सवय होते, सराव होतो. स्वत: वाचून आणि समजून लिहिण्याची सवय लागते. स्व-अभ्यासाची पाळेमुळे इथेच, याच वयात घट्ट रुजण्यास मदत होते. शिवाय लिखाणामुळे अक्षर सुधारण्यास मदत होते, ती वेगळीच.
गृहपाठ देतेवेळी शिक्षकांनी पुढील बाबी लक्षात घ्याव्यात
- केवळ नियम म्हणून गृहपाठ दिला जाऊ नये. शाळेतच नव्हे तर घरीही मुलांनी ज्या धड्याचे मनन आणि लेखन करणे आवश्यक आहे, त्याचाच गृहपाठ दिला जावा.
- स्वत:च्या विषयाव्यतिरिक्त अन्य विषयही महत्त्वाचे असतात. त्यामुळे अन्य विषयांचे शिक्षकही गृहपाठ देऊ शकतात, याचे भान बाळगावे.
- संबंधित वर्गाच्या शिक्षकांमध्ये कोणी किती गृहपाठ दिला आहे, त्याची तपासणी कधी होणार आहे, यासंदर्भातील समन्वय शिक्षकांमध्ये असणे गरजेचे आहे.
- एखाद्या विषयासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) काढत शिक्षण विभाग आपली जबाबदारी पूर्ण करते. मात्र, संबंधित जीआरची प्रत्यक्ष अंमलबजावणी काटेकोरपणे होते की नाही, याची खात्री करून घेणारी सक्षम यंत्रणा सध्या तरी अस्तित्वात नाही. ती जमिनीवर दिसावी, याकडे लक्ष दिले जाणे गरजेचे आहे.