सुदाम कुंभार, निवृत्त प्राचार्य -सध्या इयत्ता ११ वीमध्ये प्रवेश घेण्यापूर्वीच बहुतांशी विद्यार्थी १२ वीनंतर कोणत्या व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा याची तयारी करतात. त्यानुसार संबंधित महाविद्यालयात दररोज न जाता ज्या व्यावसायिक परीक्षेची किंवा अभ्यासक्रमाची तयारी करायची आहे, त्यासाठी कोचिंग क्लासेसची निवड करतात. ही निवड साधारणत: दोन ते तीन वर्षे अगोदरच केलेली असते व त्यानुसार पुढील नियोजन सुरू होते.
कोणत्या आहेत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा?हॉटेल मॅनेजमेंट, वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी नीट, झगमगीत फॅशन टेक्नॉलॉजी, इंडियन नेव्ही, कायद्याचा अभ्यास करण्यासाठी कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट, आर्किटेक्चरमध्ये करिअर करण्यासाठी नाटा, आयआयटीसाठी जेईई मेन आणि ॲडव्हान्सड प्रवेश परीक्षा, विविध राज्यांच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या परीक्षा, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षा, नॅशनल डिफेन्स अकॅडमीची तयारी आणि एव्हिएशन इत्यादी अनेक प्रवेश परीक्षा आणि त्यामधून निवडले जाणारे व्यावसायिक अभ्यासक्रम यांची माहिती विद्यार्थी आणि पालक इंटरनेटवरून तसेच समुपदेशकांच्या साह्याने घेत असतात.
या परीक्षांना प्रविष्ट होणारे सर्व विद्यार्थी यशस्वी होतातच असे नाही व त्याची कारणे सुद्धा बरीच आहेत. विद्यार्थ्यांची प्रचंड संख्या, परीक्षा पद्धतीमध्ये झालेले बदल, जसे की- लेखी तसेच शाळा, महाविद्यालयातून अंतर्गत मूल्यमापन पद्धतीमुळे अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी दिलेले गुण, त्यामुळे गुणांच्या एकूण टक्केवारीत दिसून आलेला फुगवटा इत्यादी कारणांमुळे विद्यार्थी व पालकांना क्षणिक समाधान मिळते. परंतु, देशपातळीवर किंवा राज्य पातळीवर जेव्हा एखाद्या सामाईक परीक्षेस विद्यार्थी प्रविष्ट होतात, अशावेळी पैकीच्या पैकी गुण मिळवणारे विद्यार्थी मागे पडतात.
बहुतांशी विद्यार्थ्यांनी माध्यमिक शालांत परीक्षेचा (इयत्ता १० वी) प्रचंड अभ्यास केलेला असतो. इयत्ता ११ वीमध्ये त्याच उमेदीने किंवा उत्साहाने अभ्यास होत नाही. किंवा इयत्ता १० वीची परीक्षा झाल्याबरोबर पालक किंवा समुपदेशकांकडून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार इयत्ता १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील सामायिक परीक्षेचे क्लास सुरू झालेले असतात. अर्थातच इयत्ता ११ वीचा अभ्यास आणि ज्या सामायिक परीक्षेची तयारी सुरू असते त्या परीक्षेचा अभ्यास, क्लासमधून दिलेले गृहपाठ, टॅबच्या साह्याने पाहावयाचे व्हिडीओ आणि क्लासमधून पुरविलेले अभ्यासपूरक साहित्य या गर्तेत विद्यार्थी पूर्णतः अडकलेले असतात आणि सामायिक परीक्षेसाठी काही प्रमाणात इयत्ता ११ वी आणि इयत्ता १२ वीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न असतात याचे अचूक मार्गदर्शन न मिळाल्यामुळे सर्वच विद्यार्थी या परीक्षांमध्ये यशस्वी होतात असे नाही.
आज असेही पालक आहेत, विद्यार्थी इयत्ता ८ वी उत्तीर्ण झाल्याबरोबर पुढील चार वर्षांनंतर त्यांना मिळालेल्या मार्गदर्शनानुसार सामायिक परीक्षेची तयारी करतात. इयत्ता ९ वी, १० वीचा अभ्यास आणि सामायिक परीक्षेची समांतर तयारी हे पेलण्यासाठी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी सक्षम असतात. इतर विद्यार्थ्यांची फक्त ओढाताण होताना दिसून येते. आज गरज आहे सामायिक परीक्षांची तयारी कशी आणि कधी करावी? इयत्ता ११ वी आणि १२ वीचा अभ्यास सुद्धा तेवढाच अनिवार्य आहे व याच अभ्यासक्रमांवर व काही प्रमाणात एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांवर आधारित पुढील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सामायिक परीक्षा असतात हे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी समजून घेणे महत्त्वाचे वाटते.
खरे तर कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटीची तयारी करण्यापूर्वी पात्रता, परीक्षेचे स्वरूप, गुणदान पद्धती, अभ्यासक्रम व भविष्यातील व्यवसायाच्या संधी याची माहितीसुद्धा विद्यार्थी तथा पालकांनी मिळवणे अनिवार्य वाटते. उदाहरणादाखल २०२४ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून नीट परीक्षेसाठी साधारण २,८२,००० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एकूण जागा साधारण १०,१४५, बीडीएस अभ्यासक्रमासाठी एकूण जागा साधारण ३५०० आणि बीएएमएस अभ्यासक्रमासाठी साधारण ६००० जागा, यावरून एक महत्त्वाची बाब स्पष्ट होते की, लाखो विद्यार्थी अपेक्षित असलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमापासून वंचित राहतात. फक्त वैद्यकीय क्षेत्रातीलच नाही, तर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी हीच परिस्थिती आहे.
आज व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सामायिक परीक्षांची तयारी करून घेणारे देशातील छोट्या-मोठ्या शहरातच नव्हे तर अगदी गावांपर्यंत सुद्धा खासगी शिकवणी वर्ग सुरू झालेले आहेत. विद्यार्थी, पालकांना आकर्षित करणाऱ्या त्यांच्या जाहिराती, एसटी तथा रेल्वेस्थानकावर त्यांचे भलेमोठे बॅनर्स अनेकांचे लक्ष वेधून घेतात. जोपर्यंत विद्यार्थी आणि पालक सीईटी काय आहे हे इतरांनी सांगण्यापेक्षा स्वतः समजून घेत नाहीत, तोपर्यंत हे चित्र बदलणार नाही.