Sreenath K IAS: मोबाईल फोनमुळे अभ्यास होत नाही, वेळ वाया जातो, मोबाईलमुळे लक्ष विचलित होते, असे म्हटले जाते. पण, या मोबाईलचा चांगला उपयोग केला, तर याच्यासारखी ज्ञान देणारी चांगली गोष्ट नाही. याच मोबाईल फोनमुळे अनेकण बिघडल्याचे तुम्ही ऐकले असेल, पण रेल्वे स्टेशनवर कुली म्हणून काम करणारा तरुण मोबाईलमुळे थेट IAS अधिकारी बनला आहे. हाच मोबाईल त्यांच्यासाठी पुस्तके, सिलॅबस, स्टडी मटेरियल आणि प्रॅक्टिस पेपर होते.
कोण आहेत IAS श्रीनाथ के?आज आम्ही तुम्हाला IAS अधिकारी श्रीनाथ के यांच्याबद्दल सांगणार आहोत. श्रीनाथ मुन्नारचे रहिवासी असून, ते केरळच्या एर्नाकुलममध्ये कुली म्हणून काम करायचे. श्रीनाथ एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होते आणि त्यांच्या घरातील कमाई करणारे ते एकमेव होते. कुली असताना त्यांना खूप काम करावे लागले. पण, 2018 मध्ये 27 वर्षांचे असताना त्यांना वाटले की, कुलीचे काम करुन मिळणाऱ्या पैशातून घरच्यांचे पोट भागत नाहीये. त्यावेळेस त्यांना एक वर्षांची मुलगी होती. मुलीला उज्वल भविष्य देण्यासाठी त्यांनी चांगली कमाई करण्याचे ठरवले.
डबल शिफ्टमध्ये काम केलेत्यांना दिवसाला 400-500 रुपये मिळायचे, पण नंतर त्यांनी डबल शिफ्ट सुरू केली. डबल शिफ्ट करुनही त्यांना घर भागवण्याइतके पैसे मिळत नव्हते. यानंतर त्यांनी UPSC परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांच्याकडे कोचिंग किंवा ट्यूशनसाठी पैसे नव्हते, त्यामुळे त्यांनी सेल्फ स्टडी करण्याचा निर्णय घेतला.
असे मिळवले यश
सुरुवातीला श्रीनाथ यांनी राज्यातील केपीएससी परीक्षा पास केली. यानंतर यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि चार प्रयत्नात UPSC क्रॅक केली. यासाठी त्यांनी सरकारकडून मिळणाऱ्या फ्री वायफायचा उपयोग केला. सरकारकडून स्टेशनवर मोफत वायफाय मिळते, याचा त्यांनी वापर केला. श्रीनाथ यांनी पुस्तकांवर पैसे खर्च करण्यापेक्षा स्मार्टफोन, इअरफोन आणि सिमकार्डवर खर्च केला आणि यातूनच आपले UPSC पास होण्याचे स्वप्न पूर्ण केले.