लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) जानेवारी सत्राच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशास ८ मार्चपासून सुरुवात झाली असून, ही प्रवेशप्रक्रिया २२ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांना जानेवारी ते डिसेंबर २०२२ च्या सत्रात प्रवेश घेऊन दूरस्थ माध्यमातून आपले शिक्षण पूर्ण करता येईल.
या जानेवारी सत्रामध्ये विद्यार्थी बीए, बीकॉम, बीकॉम अकाऊंटिंग अँड फायनान्स, एमए, एमकॉम, एमए शिक्षणशास्त्र व एमए भूगोल या सात अभ्यासक्रमांमध्ये हे प्रवेश विद्यार्थी घेऊ शकणार आहेत. बारावी उत्तीर्ण झालेल्या पण जुलै सत्रात प्रवेश घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी यात प्रवेश घ्यावा, असे आवाहन संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी केले.
जानेवारी २०२६ पर्यंत मान्यतावर्ष २०२० मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने जुलै सत्रासह जानेवारी सत्रातही प्रवेश देण्याची अनुमती दिली. यानुसार वर्ष २०२२ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेलाही जानेवारी सत्राचे प्रवेश करण्यास मान्यता मिळाली. मुंबई विद्यापीठाला नॅकची ए++ग्रेड व ३.६५ गुण मिळाल्याने यूजीसीने आयडॉलला जानेवारी २०२६ पर्यंत मान्यता दिली.
सेमिस्टर पद्धतीमध्ये प्रवेशn आयडॉलमध्ये जुलै सत्रामध्ये सत्र पद्धतीस प्रारंभ झाला आहे. या जानेवारी सत्रामध्ये पदवीच्या प्रथम व व्दितीय वर्ष बीए, बीकॉम व बीकॉम अकाऊंटिंग अँड फायनान्सबरोबरच पदव्युत्तर प्रथम व द्वितीय वर्ष एमए व एमकॉममध्येही सेमिस्टर पद्धत सुरू करण्यात आली आहे. n एमएमध्ये मराठी, हिंदी व इंग्रजी हे भाषा विषय असून, मानव्य व सामाजिकशास्त्रामध्ये इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, व समाजशास्त्र या विषयांसाठी प्रवेश घेता येईल. तसेच एमए शिक्षणशास्त्र व एमए भूगोल हे अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. n एमकॉममध्येही अकाऊंट्स व व्यवस्थापन असे दोन समूह विषय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. हे सर्व प्रवेश ऑनलाइन आहेत.