IIT Bombay Placements Branch Wise: भारतातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (III) बॉम्बे/मुंबई येथे नुकताच प्लेसमेंट ड्राइव्ह पार पडला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी पॅकेज वाढले आहे, पण नोकरी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. गेल्या वर्षीच्या 1,516 विद्यार्थ्यांच्या तुलनेत यंदा केवळ 1,475 विद्यार्थ्यांनाच कॅम्पसमधून नोकरी मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, IIT बॉम्बे/मुंबई प्लेसमेंट 2024 मध्ये सरासरी पॅकेजमध्ये 7.7% ची वाढ होऊन, 23.50 लाख रुपये प्रतिवर्ष झाले आहे. विशेष म्हणजे, 22 विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त पगाराची नोकरी मिळाली आहे. यंदा 78 जणांना आंतरराष्ट्रीय ऑफर मिळाल्या आहेत, ज्यात जपान, तैवान, युरोप, यूएई, सिंगापूर, यूएसए, नेदरलँड आणि हाँगकाँग येथील विविध कंपन्यांचा समावेश आहे.
यंदा B.Tech साठी 83.39 टक्के प्लेसमेंट, M.Tech साठी 83.5 टक्के आणि MS रिसर्चसाठी 93.33 टक्के प्लेसमेंट नोंदवले गेले. इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगला सर्वाधिक 232 जॉब ऑफर मिळाल्या, तर कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग 230 ऑफर्ससह दुसऱ्या स्थानावर आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग 229 ऑफरसह तिसऱ्या स्थानावर आहे. इंजिनीअरिंग आणि टेक्नॉलॉजी या क्षेत्राने सर्वाधिक नोकऱ्या ऑफर केल्या.
अहवालानुसार, या वर्षी फायनान्स क्षेत्रातील 33 वित्तीय सेवा कंपन्यांकडून 113 ऑफर आल्या आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, प्रॉडक्ट मॅनेजमेंट, मोबिलिटी, 5G, डेटा सायन्स आणि ॲनालिटिक्स या क्षेत्रांमध्येही वेगाने भरती झाली आहे.