लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कॅप प्रवेश फेरी यादी अगोदरच व्यवस्थापन कोट्यातून बेकायदा प्रवेश दिल्यास त्याला नियामक प्राधिकरणाकडून मान्यता मिळणार नाही. त्यामुळे राज्यातील तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) प्रसिद्ध केलेल्या नियमानुसार प्रवेश प्रक्रिया राबवण्याची सूचना तंत्र शिक्षण संचालनालयाचे (डीटीई) संचालक डॉ. अभय वाघ यांनी राज्यातील महाविद्यालयांना दिली आहे.
सीईटी सेलने अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आदी व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यापूर्वीच राज्यातील खासगी महाविद्यालयांनी मनमानी पद्धतीने त्यांच्या व्यवस्थापन कोट्यातील जागा भरल्याची तक्रार सीईटी सेलकडे करण्यात आली. बेकायदा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या प्रवेशांना प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून मान्यता मिळणार नसल्याचे सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. वाघ यांना पत्राद्वारे स्पष्ट केले.
डीटीईच्या अखत्यारितील महाविद्यालयांना नियमानुसार व्यवस्थापन कोटा प्रवेश प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले. महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थेच्या तरतुदीनुसार व्यवस्थापन, अल्पसंख्याक कोट्यातील जागा आणि केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनंतर रिक्त राहणाऱ्या जागांवर प्रवेश प्रक्रिया करावी. त्याचप्रमाणे सीईटी सेलच्या परिपत्रकातील नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश महाविद्यालयांना दिले आहेत.
प्रवेशाबाबतचे सक्षम प्राधिकारी सीईटी सेल आयुक्त असल्याने प्रवेशासंदर्भात त्यांच्याकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन न करता नियमबाह्य पद्धतीने केलेल्या प्रवेशांना नियामक प्राधिकरणाकडून मान्यता देण्यात येणार नाही, याची शैक्षणिक संस्थांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत नियमबाह्य प्रवेश देऊन शैक्षणिक भ्रष्टाचार होणार नाही, याची संस्थांनी काळजी घ्यावी. - डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय