मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष म्हणजेच सीईटी सेलकडून विविध व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्या असून, तीन वर्षे अभ्यासक्रमाचे तब्बल ९७ टक्के, तर पाच वर्षांच्या अभ्यासक्रमामध्ये ७७ टक्के विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. तीन आणि पाच वर्षांच्या कायदेविषयक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यंदा पाच वर्षे प्रवेशासाठी एकूण ११ हजार ८८३ जागा उपलब्ध होत्या आणि १५ हजार २१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी १८ हजार ४२६ जागा उपलब्ध होत्या आणि तब्बल ४७ हजार ४२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामधील तीन वर्षे अभ्यासक्रमासाठी १८ हजार ४३ तर पाच वर्षे अभ्यासक्रमासाठी ९ हजार २३२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पाच वर्षांऐवजी तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याकडे काही विद्यार्थ्यांचा कल आहे. हमखास रोजगार मिळवून देत असल्याने, एलएलबी अभ्यासक्रमाला पसंती मिळत असल्याचे चित्र यंदाही कायम असल्याचे सीईटी सेलकडून मिळालेल्या आकडेवारीतून स्पष्ट होते.
वकील होण्याकडे विद्यार्थ्यांचा कल, हमखास रोजगार मिळत असल्याची भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 8:55 AM