लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या काही वर्षांपासून आयटीआय प्रवेशांसाठी मोठा प्रतिसाद मिळत आहे. आयटीआयच्या माध्यमातून इलेक्ट्रिशिअनचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात मुलीही आघाडीवर आहेत. मुलींच्या आयटीआयमधील याच वाढत्या सहभागामुळे नाशिकमधील शासकीय आयटीआय राज्यातील उत्कृष्ट आयटीआय संस्था ठरली आहे. मुंबईतील लालजी मेहेरोत्रा खासगी आयटीआय संस्थेला उत्कृष्ट आयटीआय स्पर्धेत राज्यात द्वितीय तर नागपूर पुलगाव येथील शासकीय आयटीआयला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (आयटीआय) एखादा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर नोकरीच्या मोठ्या संधी मिळतात. तसेच नवउद्योजक निर्मितीला चालना मिळते. त्यामुळे दहावी, बारावीनंतर आयटीआयला विद्यार्थ्यांची पसंती मिळत आहे. राज्यातील उद्योग क्षेत्रामध्ये विविध कामासाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणे आणि त्यासाठी युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन सक्षम बनविणे, तसेच कौशल्य युक्त प्रशिक्षण घेऊन उत्पादन व इतर सेवा क्षेत्रामध्ये स्वयंरोजगार करण्यासाठी सक्षम बनविणे हेच उद्दिष्ट असायला हवे, असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे राज्याचे संचालक दिगंबर दळवी यांनी सांगितले.
औद्योगिक आस्थापनांचा दर्जा, गुणवत्ता व उत्पादन वाढवणे, राज्यातील शिला कारागीर योजना सुरू करणे यासह सर्व प्रशिक्षण योजनांची अंमलबजावणी केलेल्या संस्थांची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात उत्कृष्ट आयटीआय संस्थांची निवड केली आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी ३ तर प्रत्येक विभागातून प्रत्येकी १ अशा सहा संस्थांची निवड केल्याचे त्यांनी सांगितले. यंदाच्या वर्षात पुरस्कारासाठी निवड झालेल्या संस्थांपैकी सर्वाधिक संस्था या शासकीय असून विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
सॅनिटरी नॅपकिन युनिटची उभारणी राज्यात उत्कृष्ट ठरलेल्या नाशिकमधील मुलींच्या आयटीआयची प्रवेश क्षमता ४२० एवढी आहे. येथे ११ ट्रेंड आणि २४ युनिट्स विद्यार्थिनीसाठी असल्याची माहिती उपप्राचार्य मोहन तेलंगी यांनी दिली. फॅशन डिझायनिंग्स, कटिंग अँड स्युईंग, इंटेरिअर डेकोरेशन किंवा बेसिक कॉस्मिटॉलॉजी अशा ट्रेडसोबतच इथे इंजिनिअरिंग आणि आयटीसाठीच्या बॅचचाही समावेश आहे. इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमात मेकॅट्रॉनिक्ससारखे टेक्निकल ट्रेडदेखील मुली सहज आत्मसात करत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थिनींसाठी सीएसआर निधीतून स्मार्ट क्लासरूम, लॅब उभारणी केली आहे. याशिवाय प्लेसमेंटसाठीही विविध कंपन्यांशी संस्थेने करार केले आहेत. विद्यार्थिनींच्या शिक्षणाबरोबरच सॅनिटरी नॅपकिनचे युनिट्स उभारून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यस्तरीय पुरस्कार नाशिक - शासकीय औ. प्रा. संस्था, नाशिक (मुली) जिल्हा नाशिक - प्रथम मुंबई - लालजी मेहेरोत्रा खासगी औ. प्र. संस्था, जोगेश्वरी- द्वितीय नागपूर - शासकीय औ. प्रा. संस्था, पुलगाव, जिल्हा वर्धा- तृतीय
विभागस्तरीय पुरस्कार विभाग - संस्थेचे नाव नागपूर - अंबुजा अशासकीय औ. प्रा. संस्था - जिल्हा चंद्रपूर औरंगाबाद - शासकीय औ. प्र. संस्था, बदनापूर, जिल्हा जालना पुणे - स्व जवानमलजी गांधी खासगी औ. प्र. संस्था , कोल्हापूर नाशिक - लोकपंचायत रुरल, टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे खासगी, औ. प्र. संस्था, जिल्हा अहमदनगर मुंबई - शासकीय औ. प्र. संस्था ठाणे अमरावती - शासकीय औ. प्र. संस्था, जिल्हा अमरावती