मुंबई :
आयटीआयच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या ‘सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील तब्बल ६७ हजार ९९० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
गेल्या काही वर्षांपासून आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. उद्योगांमधील बदलते तंत्रज्ञान व त्याअनुषंगाने आयटीआयच्या अभ्यासक्रमांमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी विभागाने पुढाकार घेतला असून, यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून १५ नोव्हेंबरपर्यंत ही राज्यस्तरीय स्पर्धा जाहीर केली आहे. यामध्ये शॉर्ट टर्म सर्टिफिकेट कोर्सेस सुरू करण्याचा निर्णय विभागाने घेतला असून, स्वत: अभ्यासक्रम निवडण्याची संधी विद्यार्थ्यांना दिल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले. स्पर्धेत आतापर्यंत ५६ हजार २०७ मुले, तर ११ हजार ७०५ मुलींनी सहभाग घेतला आहे. यातील ६१ टक्के विद्यार्थी हे आयटीआयच्या प्रथम वर्षातील, तर २७ टक्के विद्यार्थी हे द्वितीय वर्षात शिकणारे आहेत.
स्वयंरोजगाराला सर्वाधिक पसंती या स्पर्धेअंतर्गत सर्वाधिक पसंती स्वयंरोजगाराशी संबंधित अभ्यासक्रमांना मिळाली असून, त्या खालोखाल विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमाला पसंती दिली आहे. त्यानंतर कृषी क्षेत्रातील अभ्यासक्रम, महिला रोजगाराशी संबंधित अभ्यासक्रम सुचविण्यात आले आहेत. दरम्यान, प्रशिक्षणार्थ्यांना आवश्यक असलेल्या अल्प मुदतीच्या अत्याधुनिक व अद्ययावत कौशल्य अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण मूळ तालुक्यात अथवा जिल्ह्यात उपलब्ध होईल व प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षणासाठी अन्य तालुका, अथवा जिल्ह्यामध्ये होणारे स्थलांतर टाळणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.