१०४ वर्षीय आजीबाईंची कमाल, राज्य साक्षरता परीक्षेत ८९ टक्क्यांनी उत्तीर्ण!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 04:23 PM2021-11-15T16:23:52+5:302021-11-15T16:27:21+5:30
दृढ निश्चय आणि ध्येय निश्चित असेल तर कोणत्याही मोठ्या संकटावर आपल्याला मात करता येते.
दृढ निश्चय आणि ध्येय निश्चित असेल तर कोणत्याही मोठ्या संकटावर आपल्याला मात करता येते. कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्त करता येतं. केरळच्या अम्मा कुट्टियम्मा (Kuttiyamma) यांनीही असाच कारनामा केला आहे. शिक्षणाला वयाची अट नसते अम्मांनी सिद्ध करुन दाखवलं आहे. कोट्टायम जिल्ह्यातील रहिवासी असेलल्या १०४ वर्षीय कुट्टियम्मा यांनी राज्य सारक्षता परीक्षेत १०० पैकी ८९ गुण मिळवून आदर्श निर्माण केला आहे.
केरळचेशिक्षणमंत्री वायुदेवन शिवनकुट्टी (Vasudevan Sivankutty) यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर राज्य सरकार अंतर्गत आयोजित एका परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १०४ वर्षीय कुट्टियम्मा यांचा फोटो ट्विट केला आहे. केरळ राज्य शिक्षा मिशन आणि राज्य सरकारकडून राज्यात साक्षरता मिशन राबवलं जातं. राज्यातील प्रत्येक नागरीक साक्षर व्हावा, चांगलं शिक्षण आणि शिक्षणाला वयाचं बंधन नसावं यांना प्रोत्साहन देण्याचं काम या योजनेअंतर्गत केलं जातं.
कुट्टियम्मा यांच्या यशाचं शिक्षणमंत्र्यांनी कौतुक केलं. "केरळ राज्य साक्षरता मिशन परीक्षेत कोट्टायम जिल्ह्यातील १०४ वर्षांच्या कुट्टियम्मा यांनी १०० पैकी ८९ गुण प्राप्त केले. शिक्षणाला वयाचं बंधन नसतं हे त्यांनी सिद्ध करुन दाखवलं आहे. मी अत्यंत प्रेम आणि सन्मानानं त्यांचं तसंच शिक्षण घेणाऱ्या सर्वांचं अभिनंदन करतो", असं ट्विट शिक्षणमंत्री वायुदेवन शुवनकुट्टी यांनी केलं आहे.
कुटियम्मा यांना नीट ऐकू येत नाही. वाढत्या वयामुळे त्यांची श्रवण क्षमता कमी झालेली आहे. पण जेव्हा केरळ राज्य साक्षरता मिशनला सुरुवात झाली तेव्हा त्यांनी स्वत:हून पर्यावेक्षकांना जे काही बोलायचं असेल तर मोठ्या आवाजात बोलावं असं सांगितलं होतं. परीक्षा दिल्यानंतर कुट्टियम्मा यांना किती गुण प्राप्त होतील असं विचारलं असता त्यांनी मला काहीच कल्पना नाही. मी तर सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. आता गुण देणं परीक्षकांचं काम आहे. कुट्टियम्मा कधीच शाळेत गेलेल्या नाहीत. त्यांना फक्त वाचता येत होतं. पण लिहिता येत नव्हता. राज्याच्या साक्षरता अभियानाअंतर्गत त्या लिहायला शिकल्या आणि परीक्षेत ८९ गुण प्राप्त केले.