शिक्षणतज्ज्ञ लिलाताईं पाटील यांना नवोपक्रम शिक्षणपद्धतीतील "ध्रुवतारा" संबोधल्यास वावगं ठरणार नाही. खरं सांगायचं तर त्यांचा परिचय देण्यासाठी कोणत्याच बिरूदावलीची आवश्यकता नाही कारण आज ज्या ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धतीचा सातत्याने पुरस्कार केला जातो ती शिक्षणपद्धतीच प्रा.लिलाताईंची खरी ओळख. या ज्ञानतपस्वीनीने कोल्हापूर येथे १९८६ मध्येच सृजन आनंद विद्यालयाच्या रूपात आदर्श शिक्षण पद्धतीचं स्वप्न सत्यात उतरवून दाखवलं. मुलांना सखोल ज्ञान मिळावं तेही कृतीतीतून ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्ष राबविली. पाठ शिकवताना मुलांच्या भावविश्वालाच साद घालण्याची कला त्यांच्यात होती. लहान वयातच मुलांवर केलेले संस्कार दृढ होतात यावर त्यांचा ठाम विश्वास होतात.
लिलाताई वयाने शासकीय सेवेतून निवृत्त झाल्या. खरं पाहिलं तर निवृत्तीनंतर अनेकजण कामातून सुटलो एकदाचं असं म्हणून निवांतपणे आयुष्याचा उपभोग घेताना आपल्याला दिसतात. लिलाताईंच वेगळेपण मात्र इथे स्पष्ट जाणवतं. चारचौघांसारखं आयुष्य जगण्यात त्यांना काडीमात्र रस नव्हता. निवृत्तीनंतर त्यांनी अध्यापन पद्धतीत अमुलाग्र बदल केला. शासनाची बंधने नकोत म्हणुन शाळेसाठी शासनाकडून मिळणारं अनुदान त्यांनी नाकारलं. लहान मुलांना स्मशान-भुतं याबाबत असणारी मनातील भीती जावी म्हणून स्मशानातील सहल, जगण्याचं-कष्टाचं महत्त्व समजावं म्हणून झोपडपट्टी भेट सर्वांनाच आजही अचंबीत करतात. पाठात येणारे संबोध तर त्या अनेक उदाहरणे, कृती, प्रोजेक्टच्या माध्यमातून समजावून देत. त्यांनी राबवलेले राबवलेले विविध उपक्रम नाविण्यपूर्ण तर होतेच पण लहान मुलांच भावविश्व यावरही त्यांनी लेखन केले. त्यांच्या पुस्तकांना तर अनेक प्रतिष्ठित संस्थांनी व शासनानेही पुरस्कारीत केले आहे हे आपणास माहीत आहेच.
नाविण्यपूर्ण असा "पालक-शिक्षक" हा प्रकल्प लिलाताईंनी त्यांच्या शाळेत सर्वात प्रथम राबवला. याचे स्वरूप असे होते की, पालकांनी शाळेत येऊन मुलांना विशिष्ट कालावधीसाठी शिकवायचे. तर या प्रकल्पात लिलाताईंच्या मार्गदर्शनाखाली शिकवणाऱ्या पालक रमा दत्तात्रय गर्गे म्हणतात की पाठ शिकवण्याअगोदर खूप तयारी करावी लागायची. जसे फुलपाखरू हा शब्द पाठात आला असेल तर त्याचे फक्त चित्र, वा उडणारे फुलपाखरू दाखवणे म्हणजे मुलांना शिकवले असे नव्हे तर त्यांचा जन्म, कोश, रंग, वैशिष्ट्य,अन्न, जगण्याचा कालावधी असं सर्वच सांगावे लागे. जिथे पालकांनाच इतकी तयारी करावी लागत असेल तर तेथील शिक्षकाची काय अवस्था असेल हे न सांगताही कळून येते. सृजनमधील शिक्षक व इतर शाळातील शिक्षक यांत खूप फरक आहे हे त्या आवर्जून सांगतात.
अभ्यासक्रमाचं इतकं काटेकोर नियोजन, शैक्षणिक साधने, विद्यार्थ्यांच्या तपशिलवार वैयक्तिक नोंदी, सकारात्मक संस्कारासाठी राबवलेले उपक्रम अन् शैक्षणिक अनुभवांचा खजिना मुलांसमोर रिता केल्यानंतर ते बालमन निश्चितच समृद्ध होत असणार. या ज्ञानमंदिरातील मुलांच्या प्रगतीचा आलेख हा इतर मुलांपेक्षा निश्चितच वेगळा दिसून येतो.
डॉक्टर , इंजिनियर किंवा समाजमान्य क्षेत्रात नाव कमावणं ही काही यशाची परिमाणं नव्हेत .तर आहे त्या क्षेत्रात राहुन स्वत:च्या आवडी-निवडी जपत, माणूस म्हणुन समृद्ध आयुष्य जगता येणं म्हणजे जीवनात साध्य केलेलं खरं यश... त्या काळात लिलाताईंच्या हाताखाली शिकलेल्या नुकतेच तारूण्यात पदार्पण केलेल्या मुलां-मुलींशी संवाद साधण्याचा योग आला तेव्हा ती मुले भरभरून बोलत होती. लिलाताईंच्या या जादुई दुनियेतील दिवस म्हणजे आठवणींची सुगंधित कुपीच. जिचा दरवळ आजही आसमंत व्यापून टाकतोय.
लहानपणी खूप हळवी,अबोल असणारी ईशा धनंजय इनामदार लेखन करते. विशेष म्हणजे दुसरीत असताना तिने कविता केली होती आज तिची दोन पुस्तके प्रकाशित झालीत.सध्या कोल्हापुरात ती एस.वाय.बी.ए करतेय. तसेच पुणे येथे शिकणारा नचिकेत गर्गे नुकताच टाटा कंपनीत इंजिनियर म्हणून रूजू झालेला अक्षय इनामदार, यश शिंदे यांसारखी अनेक मुले करियर म्हणून विविध क्षेत्रे निवडलेली ही सृजन आनंदचा संस्कारमय वसा जपत आत्मविश्वासाने बोलतात, नवनवीन छंद मनापासून जोपासतात, सामाजिकतेचे भान ही नसानसात भिनले आहे त्यांच्या.अगदी घरातही आईला छोट्या छोट्या कामात मदत अगदी सहजपणे करतात. अन् हो त्यांच्यातील संस्काराच श्रेय ते घरच्यांसोबत सृजन आनंदच्या लिलाताईंना आवर्जून देतात. असं म्हणतात की कोणत्याही पुरस्कारापेक्षा शिक्षकाचं खरं मुल्यमापन विद्यार्थीच करतात जे लीलाताईंच्याबाबतीत अगदी यथार्थ ठरतं.
सृजनमध्ये इयत्ता चौथीपर्यंतच शिक्षण दिले जाते. काही पालकांनी आग्रह करुनही तत्कालिन संस्थांनी ही पद्धत स्वीकारण्यात नेहमीच उदासिनता दाखवली. याबाबत काही पालकांच मत जाणून घेतलं त्यात पालक स्मिता किशोरकुमार शिंदे म्हणतात की लिलाताईंची ही पद्धत बालमानसशास्त्रावर आधारित होती. चिकित्सक होती. त्यामुळे कदाचित इतकी मेहनत घेण्याची कुणाची मानसिकता नसेल तसेच प्रत्येक शाळेचे स्वत:चे नियम असतात. म्हणुन पालक म्हणुनही आम्हीही ते स्विकारत गेलो सृजन संस्कार अन प्रत्यक्ष जीवन यांचा ताळमेळ साधण्यात ही मुलं बऱ्याचअंशी हे शिवधनुष्य अगदी सहजपणे पेलताना ही दिसतात अन हेच खरं लीलाताईंचं जीवनशिक्षण.
एक खंत मात्र नक्की वाटते की, त्याकाळात आजच्यासारखी प्रसिद्धीची साधने असती तर या शिक्षणपद्धतीचा प्रसार वेगाने झाला असता व निश्चितच योग्य दिशा आजच्या शिक्षण प्रवाहास मिळाली असती.
आजकाल आपण पाहतो की सातत्याने म्हटले जाते की शिक्षणात उपक्रमशिलता असावी... नवोपक्रम राबवावेत... कृतीसंशोधन करावे असे शिक्षकांना डी.एड,बी.एड,ट्रेनिंग,तज्ज्ञांची मार्गदर्शने यात सांगितले जाते व त्याप्रमाणे उपक्रमात नाविण्य साधत कृतीत उतरवण्याचा प्रयत्नही बरेच शिक्षक करत असतात... उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न करतात. परंतु मुलं जेव्हा शाळेच्या परिघाबाहेर जातात तेव्हा ती शाळेत दिलेल्या ज्ञानाचा व्यवहारात वापर करून समाजात आपला उत्कर्ष साधत असतील तर ते उपक्रमशिलतेचे फलित मानले जाते. अन् हे फलित सृजन आनंदमधील विद्यार्थ्यांना प्रायोगिक तत्त्वावर अभ्यासल्यास असे लक्षात येते की, लिलाताईंसारखे वैशिष्ट्य पूर्ण उपक्रम घ्यावेत जेणेकरून विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा मिळू शकेल व सर्व शिक्षकांनाही अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आनंददायी करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. शिक्षणातील या उपक्रमशिलतेची उपयोगिताही सिद्ध होईल. तिचा सकारात्मक प्रभाव विद्यार्थ्याच्या आयुष्यावर दिसेल अन् हेच प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकाच्या जीवनाचं ध्येय.
शैक्षणिक क्षेत्रात प्रा. लिलाताई पाटील नावाच्या या तपस्विनीच्या स्वप्नातील शिक्षण व्यवस्था निर्माण व्हायची असेल तर त्यांच्यासारखे शिक्षक प्रत्येक शाळेत निर्माण होणे गरजेचे आहे तरच महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण जग ही आनंददायी शिक्षण पद्धती स्वीकारेल कारण सक्षम पिढी निर्माण करण्याचं सामर्थ्य यात आहे.... गेल्या तीन दशकांपासून लिलाताईंनी निर्माण केलेली ही पायवाट "एकला चलो रे !! या भुमिकेत होती. काहीच शिक्षक असे आहेत जे या पायवाटेवरुन जाताना दिसतात पण ते पुरेसे नक्कीच नाही म्हणून या पायवाटेचा आता " ज्ञानपथ " होणे आवश्यक आहे. या ज्ञान तपस्विनीला हीच खरी आदरांजली ठरेल.
- मंजुश्री बाजीराव धिवर, (शिक्षिका, रयत शिक्षण संस्था) अहमदनगर मो.नं - 9762867600