मुंबई – मागील वर्षभरापासून संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट उभं राहिलं आहे. कोरोनाचा फटका शैक्षणिक क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात बसला आहे. लॉकडाऊन आणि कडक निर्बंधांमुळे बहुतांश भागात शाळा वर्षभरापासून बंद आहेत. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणावर भर दिला असला तरी त्यालाही अनेक मर्यादा आहेत. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात यंदाही २५ टक्के कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे.
याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड(Varsha Gaikwad) म्हणाल्या की, सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय केल्यानंतर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गतवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता इ. १ ली ते इ. १२ वीपर्यंतचा २५% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे यंदाही शाळा वेळेत सुरु न करता आल्याने विहित वेळेत पाठ्यक्रम पूर्ण व्हावा व तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना त्यांची शिक्षणातील उद्दिष्टे साध्य करता यावीत,याअनुषंगाने हा निर्णय घेतला आहे.कमी केलेल्या पाठ्यक्रमाची तपशीलवार माहिती लवकरच दिली जाईल असं त्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र शासनानं अधिकृत परिपत्रक काढत याची घोषणा केली आहे. पत्रकात म्हटलंय की, केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार मार्च २०२० पासून राज्यामध्ये सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहेत. दरवर्षी साधारणत: जूनमध्ये सर्व राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होते. मात्र २०२१-२२ मध्ये नेहमीप्रमाणे शाळा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. वेळेवर शाळा सुरू करता न आल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्याबाबत समस्या निर्माण होऊ शकतात असं त्यांनी सांगितले आहे.
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर २०२१-२२ मध्ये इयत्ता पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कमी करण्यात आलेल्या पाठ्यक्रमाची यादी राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेचे संचालक यांच्याकडून प्रसिद्ध केली जाईल असंही शासकीय परिपत्रकात म्हटलं आहे.