मुंबई – राज्यात वाढत्या कोरोनाच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं होतं. अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे आता दहावीची परीक्षा जूनमध्ये तर बारावीच्या परीक्षा मे अखेरीस होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. (Maharashtra SSC, HSC Exams 2021 Postponed due to Corona crisis)
परीक्षा पुढे ढकलण्याची काँग्रेसची मागणी
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता परिस्थीती अत्यंत बिकट होत चालली आहे. राज्यात दररोज ५० हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण होत आहे. शहर व ग्रामीण भागातही कोरोनाचे संक्रमण वाढलेले दिसत आहे. अशा गंभीर परिस्थितीत परीक्षा घेणे हे लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ केल्यासारखे होईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती.
दहावी-बारावीच्या परीक्षा जून किंवा त्यानंतरच घ्याव्यात
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दहावी, बारावीची ऑफलाइन परीक्षा जून महिन्यात किंवा त्यानंतर घ्यावी, असे मत ६९ टक्के विद्यार्थी, शिक्षकांनी मांडले. दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात राज्य शिक्षक परिषदेकडून राज्यातील पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले. यात २,६०० हून अधिक शिक्षक, विद्यार्थी सहभागी झाले होते. सध्याच्या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तब्बल ४२.२ टक्के शिक्षक, विद्यार्थ्यांनी जूनमध्ये, तर ३३.१ टक्के विद्यार्थी, शिक्षकांनी जुलै महिन्यात परीक्षा घ्यावी, असे मत मांडले. एकूण ६९.३ टक्के विद्यार्थी, शिक्षकांनी सध्या परीक्षा घेण्यास विरोध दर्शविला होता.
राज्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने पहिली ते आठवीप्रमाणेच नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही वर्गोन्नती म्हणजे परीक्षेविना थेट पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता. राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा नेमक्या कशा घेतल्या जाणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता थेट पास केलं जाणार असल्याची घोषणा वर्षा गायकवाड यांनी याआधीच केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षाविना पास करण्यात यावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं सांगितलं होतं.