चेन्नई, म्हैसूर, मुंबई असो किंवा मग यूएई ते अगदी केनिया आणि मलेशिया या देशांमधील विद्यार्थ्यांसाठी लॉकडाऊनच्या काळात भारतातील एक शिक्षक देवदूत ठरलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. संजीव कुमार असं या देवदूत शिक्षकाचं नाव असून ते मूळचे पंजाबच्या भटिंडा येथील आहेत. व्हिडिओ कॉन्फन्सिंगच्या माध्यमातून संजीव कुमार आज तब्बल ३,५०० विद्यार्थ्यांना गणिताचे धडे देत आहेत आणि तेही कोणतंही शुल्क न घेता. संजीव कुमार यांच्या याच कार्याची दखल आता घेतली जाऊ लागली आहे. (This Math Teacher Is Coaching Over 3,500 Students Online for Free)
भारतात गेल्या वर्षी लॉकडाऊनला सुरूवात झाल्यानंतर संजीव कुमार यांनी ऑनलाइनला शिकवणीला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी तामिळनाडू, जम्म-काश्मीर, केरळ येथील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाइन शिकवणी द्यायला सुरुवात केली. यात भारताबाहेरील ८० विद्यार्थ्यांचाही त्यावेळी समावेश होता.
४३ वर्षीय संजीव कुमार गेल्या १८ वर्षांपासून गणित विषय शिकवत आहेत. "मी २९ मार्च २०२० रोजी पहिला ऑनलाइन क्लास सुरू केला होता. त्यावेळी माझ्याकडे शिकवणीला केवळ ५० विद्यार्थी होते. दुसऱ्याच दिवशी मला ३५० मेसेजेस आले. अवघ्या दहा दिवसात माझ्याकडे शिकवणीसाठी ६०० ते ७०० विद्यार्थी आले", असं संजीव कुमार सांगतात.
मार्च २०२१ पर्यंत विद्यार्थ्यांचा आकडा २,५०० पर्यंत पोहोचला आहे. यातील ७०० विद्यार्थ्यांनी बारावीची ग्रेड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर क्लासमध्ये सहभागी होणं बंद केलं आहे. त्यानंतर १,७०० विद्यार्थी आणखी वाढले. मग संजीव कुमार यांनी विद्यार्थ्यांचे गट करुन शिकवणी देण्याचा निर्णय घेतला.
"दिवसाला एकूण पाच शिकवणी वर्ग भरतात. प्रत्येक वर्गासाठी मी १ तास देतो. त्यानंतर केनिया आणि यूएईमधील विद्यार्थ्यांसाठी दरआठवड्याला दोन स्पेशन बॅच घेतो. याशिवाय नॅशन टॅलेंट सर्च एग्झामिनेशनसाठी (एनडीएसई) विद्यार्थ्यांच्या शंका दूर करण्यासाठी देखील वेगळे बॅच घ्यावे लागतात", असं संजीव कुमार यांनी सांगितलं. विशेष म्हणजे, संजीव कुमार यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतंही शुल्क घेत नाहीत.
संजीव कुमार यांच्या पत्नी देखील शिक्षिका आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना नोट्ससाठी मदत करतात. "संजीव सरांच्या ऑनलाइन शिकवणीची खूप मदत झाली. कठीण विषय सोपे करुन सांगण्याची त्यांची शैली खूप चांगली आहे", असं आदर्श नावाचा सौदी अरेबियातील विद्यार्थी सांगतो.