लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सरकारबरोबर खासगी कॉलेजांची बैठक न झाल्याने एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर दुसऱ्या दिवशीदेखील तोडगा निघाला नाही. कॉलेज शनिवारीही प्रवेश प्रक्रिया न राबविण्यावर ठाम आहेत. त्यातच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) आणि आरोग्य विद्यापीठाला पत्र लिहून कॉलेजांवर कारवाई करण्यास सांगितले आहे. त्यातून विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर टांगती तलवार कायम आहे.
राज्य सरकारकडून खासगी कॉलेजांमध्ये विविध प्रवर्गांतून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत दिली जाते. सरकार त्याची प्रतिपूर्ती कॉलेजांना करते. मात्र, मागील काही वर्षांचे कॉलेजांचे शुल्क मिळणे बाकी आहे. त्यातून कॉलेजेस आक्रमक झाली.. त्यांनी एमबीबीएसच्या दुसऱ्या फेरीचे प्रवेश न करण्याचा निर्णय घेतला आहे. सीईटी सेलने जाहीर केलेल्या दुसऱ्या फेरीच्या गुणवत्ता यादीतील पालकांना दुसऱ्या दिवशीही प्रवेशाविना माघारी परतावे लागले.
नागपूर येथील एनकेपी साळवे कॉलेजच्या प्रवेश यादीत मुलीचा क्रमांक आला आहे. प्रवेशासाठी मुंबईहून गुरुवारी कॉलेजमध्ये गेलो. शुक्रवारीही कॉलेजने प्रवेश द्यायला नकार दिला. त्यातून हॉटेलची खोली घेऊन राहावे लागत आहे. - सुरेंद्र चौधरी, पालक
सरकारकडे आधीची शिष्यवृत्तीची रक्कम प्रलंबित आहे. पैसे न मिळाल्यास कॉलेजेस पगारही देऊ शकणार नाहीत. सरकारबरोबर शुक्रवारी या प्रश्नावर बैठक झाली नाही. त्यातून प्रवेश प्रक्रिया सुरू न करण्यावर ठाम आहोत.- सदस्य, असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ अनएडेड प्रायव्हेट मेडिकल अँड डेंटल कॉलेजेस
विद्यार्थ्यांच्या तक्रारी आरोग्य विद्यापीठाला पाठविल्या आहेत, तसेच एनएमसी आणि आरोग्य विद्यापीठांना कॉलेजांवर कारवाई करावी, असे पत्र शुक्रवारी लिहिले आहे. प्रवेश प्रक्रिया बाधित होत असून,प्रवेशासाठी पुढील कॉलेज निवडण्यासही अडचणी येत आहेत. प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देशही सर्व कॉलेजांना दिले आहेत. - दिलीप सरदेसाई, आयुक्त, सीईटी सेल