नवी दिल्ली – कॅम्प्युटर एप्लिकेशनमध्ये मास्टर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. आता सर्व विद्यार्थ्यांसाठी एमसीए(MCA) डिग्री कोर्स फक्त २ वर्षाचा असणार आहे. ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन(AICTE) ने याबाबत मोठा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. यासंदर्भात काऊन्सिलनं परिपत्रकही काढलं आहे.
परिपत्रकात ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनचे सचिव राजीव कुमार यांनी सांगितले की, विद्यापीठ अनुदान आयोग(UCG) ने डिसेंबर २०१९ च्या बैठकीत एमसीए कोर्सचा कालावधी ३ वर्षावरुन कमी करत २ वर्षावर आणण्यावर सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता एआयसीटीईने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या कोर्सकडे आकर्षिक करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. काऊन्सिलने याबाबत सर्व कॉलेज आणि विद्यापीठांना परिपत्रक पाठवलं आहे.
यापूर्वी एमसीए कोर्स दोन आणि तीन वर्षासाठी होता, एका कोर्सचा दोन वेगवेगळे कालावधी होते. जे विद्यार्थी बीएससी कॅम्प्युटर सायन्स अथवा बीसीए करुन एमसीए करत होते, त्यांना २ वर्षात एमसीए पदवी मिळत होती. तर इतर पदवीधारक जे मॅथ्ससह अन्य कोर्स करत होते त्यांच्यासाठी एमसीएचा कालावधी ३ वर्षाचा होता. पण आता सर्व विद्यार्थ्यांसाठी एमसीएचा कालावधी फक्त २ वर्षाचा असणार आहे.
त्यामुळे आता २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून एमसीएचा कोर्स ३ ऐवजी २ वर्षाचा असेल. यात बीसीए, कॅम्प्युटर सायन्स, इतर पदवीधारक, गणित विषय घेतलेले बीएससी, बीकॉम आणि बीए पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना एमसीएला प्रवेश घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना एमसीएत प्रवेश घेण्यासाठी कमीत कमी ५० टक्के मार्क्स हवे आहेत. तसेच आरक्षित विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शैक्षणिक अर्हतेत ५ टक्के सूट देण्यात आली आहे.