तुम्ही अनेकदा पाहिला असाल की भर दुपारच्या उन्हात तुम्हाला रस्त्यावरून जात असताना दूरवर पाणीच पाणी दिसत असते. मात्र, तिथे तुम्ही जेव्हा पोहोचता तेव्हा पाणी नसते. म्हणजेच ती जागा दुरून चकाकत असते. असाच भ्रम वाळवंटात देखील होत असतो. यामागे काय कारण असेल बरे... विसरलात ना...
विज्ञानाच्या पुस्तकांमध्ये या प्रकारच्या वायुमंडळाच्या दिसण्याला मृगजळ (Mirage) असे म्हणतात. यामध्ये लांबवर तुम्हाला तवालासारखे पाणीच पाणी दिसते, कुठे सावल्या दिसतात. हे कसे होते हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला काही काळ मागे जावे लागेल, तुमच्या शाळेत. आली ना आठवण... तेव्हा आपण सारे शाळेत जायचो... दुपारच्या रणरणत्या उन्हात खेळायचो, चालायचो तेव्हा हे आपल्याला नेहमी दिसायचे.
उन्हाळ्यात पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवा गरम होते आणि वरच्या दिशेने जाऊ लागते. त्यावरील थंड हवा जड असल्याने ती खाली येऊ लागते. अशा प्रकारे हवेतच थंड-गरम हवेचे अनेक थर तयार होतात. जेव्हा सूर्यप्रकाश या हवेच्या थरांवर पडतो तेव्हा हा सारा भासांच्या मृगजळाचा खेळ सुरु होतो.
ही प्रकाश किरणे या हवेच्या थरांमधून अपरिवर्तित होऊ लागतात. तसतसे आपल्याला कुठे सावल्या, कुठे चकचकीतपणा दिसू लागतो. या किरणांचा मार्ग विचलित होतो. यामुळे त्या ठिकाणी वस्तूची काल्पनिक सावली तयार होऊ लागते. यामुळे तुम्हाला मृगजळात पाण्याचा भास होऊ लागतो.