लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बदलत्या काळानुसार सीईटी सेल (सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष) आपल्या कार्यपद्धतीत बदल करण्याचा प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर सीईटी परीक्षांसाठीची नोंदणी पालक विद्यार्थ्यांसाठी अधिक सोपी, सहज व्हावी या हेतूने सीईटी सेलकडून पहिल्यांदाच नोंदणी आणि प्रवेश प्रक्रियेसाठी मोबाईल प्रणाली (मोबाईल ॲप्लिकेशन) विकसित करण्यात येत आहे. सीईटी सेलच्या मोबाईल प्रणालीची तयारी अंतिम टप्प्यात असून विद्यार्थी पालकांना लवकरच ते उपलब्ध होणार असल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली.
सीईटी सेलकडून यंदाच्या सीईटी परीक्षांसाठीची नोंदणी सुरू झाली असून आतापर्यंत ४ अभ्यासक्रमांच्या नोंदणीसाठी सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, सीईटी परीक्षेसाठी नोंदणी आणि कॅप प्रवेश यासाठी विद्यार्थी- पालकाना यंत्रणा सहज उपलब्ध होणे अनेकदा कठीण होते. विद्यार्थ्यांना ही प्रक्रिया सहज हाताळता यावी यासाठी प्रणाली विकसित करण्यात येत असल्याचे वारभुवन यांनी स्पष्ट केले.
ही प्रणाली अँड्रॉइड स्मार्टफोन्स, टॅबलेट्स आणि आयओएस कार्यप्रणालीवर आधारित असणार आहे. विद्यार्थ्यांना सीईटी आणि कॅम्पसाठी अर्ज करणे, वेळोवेळी अद्ययावत माहिती मिळविणे व इतर आवश्यक प्रवेश परीक्षा व प्रवेश प्रक्रियेसंबंधी माहिती उमेदवारांना त्वरित मिळणे सोपे व्हावे, हा या प्रणालीच उद्देश असणार आहे.