मुंबई - विद्यापीठामध्ये संशोधनाला चालना मिळावी यासाठी मुंबई विद्यापीठातून पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्षातून दोन वेळा पेट परीक्षा घेण्याचे आश्वासन मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, यंदाच्या पेट परीक्षेबाबत विद्यापीठाकडून अद्याप सूचना जारी झालेली नाही.
विद्यापीठातर्फे दरवर्षी घेण्यात येणारी पेट परीक्षा २०२१ पूर्वी तीन वर्षे घेण्यात आली नव्हती. ही बाब सिनेट सदस्य ॲड. वैभव थोरात यांनी विद्यापीठाच्या लक्षात आणून देत वर्षातून दोन वेळा पेट परीक्षा घेण्याची सूचना केली. त्यानुसार २०२१ मध्ये मुंबई विद्यापीठाकडून मार्च आणि डिसेंबरमध्ये पेट परीक्षा घेण्यात आली होती. विद्यापीठाकडून या वर्षातील दुसरी पेट परीक्षेबाबत तारीख जाहीर झाली नाही. त्यामुळे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी लक्ष घालून परीक्षा घेण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती सिनेट सदस्य थोरात आणि डॉ. धनराज कोहचाडे यांनी केली आहे.पेट परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या तयारीमध्ये सातत्य ठेवता येणार आहे. विद्यापीठामध्ये संशोधनावर भर देण्यासाठी पेट परीक्षा गरजेची आहे. त्यामुळे कुलगुरूंनी लक्ष देत परीक्षा तारखा जाहीर कराव्यात. - वैभव थोरात, सिनेट सदस्य, युवासेना.