लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई विद्यापीठाची देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत सलग दुसऱ्या वर्षी घसरण झाली. राष्ट्रीय संस्थात्मक श्रेणी रचनेत (एनआयआरएफ) मुंबई विद्यापीठाचे स्थान ६१ पर्यंत घसरले आहे. गेल्या वर्षी विद्यापीठ ५६व्या तर २०२२ मध्ये ४५व्या स्थानावर होते. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सोमवारी यंदाची श्रेणी जाहीर केली. देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्थांच्या यादीतही विद्यापीठाला पहिल्या १०० मध्ये स्थान मिळवता आले नाही. भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू सलग नवव्यांदा सर्वोत्तम विद्यापीठ ठरले.
सर्वाेत्तम महाविद्यालयांमध्ये केवळ ४
सर्वाेत्तम महाविद्यालयांमध्ये दिल्लीतील हिंदू काॅलेज हे आघाडीवर आहे. तर पुण्यातील फर्ग्युसन काॅलेज, नागपूरचे इंस्टिट्यूट ऑफ सायन्स, मुंबईतील सेंट झेव्हियर्स काॅलेज, अमरावतीतील शिवाजी विज्ञान महाविद्यालय या राज्यातील केवळ ४ महाविद्यालयांचा समावेश आहे.
राज्यातील टाॅप १०
आयआयटी मुंबई, हाेमी भाभा नॅशनल इंस्टिट्युट मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, इंडियन इंस्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च पुणे, सिम्बायाेसिस इंटरनॅशनल पुणे, इंस्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नाॅलाॅजी मुंबई, डाॅ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणे, दत्ता मेघे इंस्टिट्युट ऑफ हायर एज्युकेशन ॲण्ड रिसर्च वर्धा, व्हीएनआयटी नागपूर, नरसी माेनजी इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मुंबई आणि टाटा इंस्टिट्युट ऑफ साेशल सायंसेस मुंबई.
आयआयटीच्या श्रेणीत सुधारणा
आयआयटी मुंबई यंदा सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्थांच्या यादीत तिसरे स्थान पटकाविले आहे. गेल्यावर्षी आयआयटी मुंबई चौथ्या स्थानी होते. देशातील सर्जनशीलतेतील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्थांच्या क्रमवारीत आयआयटी मुंबईने देशात पहिले स्थान पटकावित मानाचा तुरा रोवला आहे. तर नव्याने स्थापना करण्यात आलेले आयआयएम, मुंबई गेल्यावर्षी ७व्या स्थानी होते. यंदा ते ६व्या स्थानी आले आहे.