नवी दिल्ली - आता लवकरच देशभरातील मदरशांमध्ये (madrasa) रामायण (ramayana) आणि भगवद्गीतेचे (bhagavad gita) धडे दिले जाणार आहेत. एवढेच नाही, तर येथील विद्यार्थ्यांना योगाचेही धडे दिले जातील. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंग (NIOS) प्राचीन भारतीय ज्ञान आणि परंपरा या पार्श्वभूमीवर 100 मदरशांतून नवा अभ्यासक्रम सुरू करत आहे आणि याची संपूर्ण तयारीही झाली आहे. (National institute of open schooling to take bhagavad gita ramayana to madrasas)
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगचा हा नवा अभ्यासक्रम नव्या शिक्षण धोरणाचा भाग आहे. शिक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या एनआयओएस (NIOS) वर्ग 3, 5 आणि 8 साठी बेसिक कोर्सची सुरुवात करेल. सुरुवातीला 100 मदरशांपासून याची सुरुवात करण्यात येईल. तसेच भविष्यात हा कार्यक्रम 500 मदरशांपर्यंत नेण्यात येईल. एनआयओएसचे अध्यक्ष सरोज शर्मा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
अहवालानुसार, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंगने (NIOS) भारतीय ज्ञान परंपरेसंदर्भात 15 कोर्स तयार केले आहेत. यात वेद, योग, विज्ञान, संस्कृत भाषा, व्यावसायिक कौशल, रामायण, गीता आणि पाणिनी-प्रवर्तित महेश्वरा सूत्र यांचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम तिसऱ्या, पाचव्या आणि 8 व्या वर्गाच्या बरोबरचा आहे.
केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी मंगळवारी नोएडा येथील एनआयओएसच्या केंद्रीय मुख्यालयात याचे स्टडी मटेरिअल जारी केले. यावेळी त्यांनी, 'भारत प्राचीन भाषा, विज्ञान, कला, संस्कृती आणि परंपरांची खान आहे. आता देश आपली प्राचीन परंपरा पुनर्जीवित करून ज्ञानाच्या क्षेत्रात सुपरपावर होण्यास तयार आहे. आपण या कोर्सचा लाभ मदरसा आणि जगभरातील समाजापर्यंत पोहोचवू,' असे म्हटले आहे.