NEET (UG) 2021 Date announced: नीट परीक्षेच्या तारखांची अधिकृत घोषणा अखेर करण्यात आली आहे. नवनिर्वाचित केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटरच्या माध्यमातून नीट परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. नीट (यूजी) २०२१ परीक्षा १२ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे. परीक्षेचं आयोजन कोरोना संदर्भातील नियमांचं पालन करुनच केलं जाणार आहे. या परीक्षेसाठी nta.ac.in किंवा ntaneet.nic.in या वेबसाइट्सवर उद्यापासून नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. (NEET 2021 UG exam date announced by Education Minister Dharmendra Pradhan NEET UG 2021 application )
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता परीक्षा केंद्रांवर आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. यात विद्यार्थ्यांना मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करुन देण्यापासूनची व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याची आणि परीक्षा केंद्रातून बाहेर पडण्यासाठीची वेळ देखील निश्चित केली जाणार आहे. कोणत्याही व्यक्तीच्या संपर्काविना नोंदणी, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानुसार बैठक व्यवस्था अशा सर्व नियमांचं पालन केलं जाणार आहे.
देशभरातून लाखो विद्यार्थी NEET UG 2021 परीक्षेच्या तारखांची वाट पाहात होते. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून नीट परीक्षेबाबत सविस्तर माहिती देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात परीक्षा होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्याच्या १२ तारखेला परीक्षा होणार असल्याचं अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं आहे.