मुंबई :यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार यंदा एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या समान गुणांच्या आधारे प्रवेश देताना जन्मदिनांकापासून ज्येष्ठ विद्यार्थी अगोदर याप्रमाणे क्रम आणि जन्मदिनांक समान असल्यास विद्यार्थ्याचे पूर्ण नाव (म्हणजे नाव, वडिलांचे नाव, आडनाव) इंग्रजी घेऊन त्या वर्णाक्षरांच्या क्रमानुसार क्रम ठरविण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे गुण समान असले तरी विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी अडचण येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी अकरावी प्रवेशाची व्याप्ती वाढविण्यात आली असून, वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणांप्रमाणे यंदा या प्रवेशाच्या कार्यपद्धतीत शासनाने बदल केले आहेत. अकरावी प्रवेशातील सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाकरिता (एसईबीसी) सामान्य प्रशासन विभागाच्या ५ जुलै, २०२१ च्या निर्णयाप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. याशिवाय इनहाऊस कोट्यांतर्गत प्रवेश कोणत्याही टप्प्यावर करण्याची व प्रत्यार्पित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना सहसचिव इ. मु. काझी यांनी दिल्या आहेत.
२८ मार्च २०१६ च्या शासन निर्णयाप्रमाणे ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यांतील मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील वसई व भिवंडी तालुका व पनवेल (ग्रामीण) हा भाग तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मोशी, चऱ्होली, चिखली, दिघी, डुडूळगाव या ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालय / कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नव्हते. मात्र यंदा या गावांचाही प्रवेश प्रक्रियेत समावेश करावा, अशा सूचना शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत. तसेच शिक्षण संचालनालयाने आवश्यक ती कार्यवाही करून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवावी, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.आता एका फेरीसाठी प्रतिबंधितप्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी, प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी आणि महाविद्यालयाने प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत नियमित फेऱ्यांसाठी प्रतिबंधित करण्यात येऊन चौथ्या विशेष फेरीत संधी देण्यात येत असे. मात्र या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. नवीन निकषांप्रनुसार या विद्यार्थ्यांना पुढच्या केवळ एका फेरीसाठी प्रतिबंधित करण्यात येऊन त्यानंतरच्या फेरीसाठी संधी द्यावी, असा निर्णय घेण्यात आला आहे.