रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नीट-यूजीच्या सदोष निकालामुळे झालेला गोंधळ अजून शमलेला नसताना आता एमएचटी-सीईटीच्या निकालाबाबतही विद्यार्थी-पालकांकडून साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. एमएचटी-सीईटीच्या निकालाबाबत ‘आन्सर की’च्या (उत्तरतालिका) आधारे मिळालेले मार्क आणि पर्सेंटाइल यात तफावत असल्याची विद्यार्थी-पालकांची मुख्य तक्रार आहे. रविवारी निकाल लावण्यापूर्वी सीईटी-सेलच्या वेबसाइटवर ‘आन्सर की’ जाहीर करण्यात आली होती. काही विद्यार्थ्यांनी या ‘आन्सर की’चे स्क्रीन शॉट काढून ठेवले होते. ‘आन्सर की’नुसार जे गुण मिळायला हवे होते, त्याच्याशी निकालात दिलेले पर्सेंटाइल जुळत नसल्याचे विद्यार्थी म्हणत आहेत.
उदाहरणार्थ एका विद्यार्थ्याला साधारण ६० आणि चुकीच्या प्रश्नाकरिता दिलेले गेलेले आठ ग्रेस मार्क धरून ६८ च्या आसपास गुण मिळायला हवे होते. २०० गुणांच्या परीक्षेत साधारण ३० ते ६० दरम्यान पर्सेंटाइल मिळतील, अशी अपेक्षा या विद्यार्थ्याला होती. प्रत्यक्षात केवळ पाचच पर्सेंटाइल आल्याने आपण चक्रावून गेल्याची तक्रार त्याने केली. आणखी एका १२४ (ग्रेसमार्क धरून १३२) गुण मिळालेल्या विद्यार्थ्याचा पर्सेंटाइल ६० दाखविला आहे.
निकालाबाबत तक्रार असलेले अनेक विद्यार्थी-पालक गेले दोन दिवस सीईटी-सेलच्या कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. अनेकांनी याबाबत लेखी निवेदन देत निकालातील तफावत दूर करण्याची मागणी केली आहे. तर काहींनी राजकीय नेत्यांकडे आपली कैफियत मांडली आहे. याबाबत सीईटी सेलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र प्रतिसाद नाही.
आज आयुक्तांची भेट घेणारआम्ही निकालाची फेरतपासणी करण्याची मागणी केली आहे. बुधवारी आदित्य ठाकरे सीईटी सेलच्या आयुक्तांचीही भेट घेणार आहेत, अशी माहिती युवा सेनेचे नेते आणि माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली.
विद्यार्थी-पालकांची पारदर्शकतेची मागणीएमएचटी-सीईटी ऑनलाइन आणि वेगवेगळ्या दिवशी आणि शिफ्टमध्ये घेतली जाते. प्रश्नपत्रिका वेगळी असल्याने प्रत्येक शिफ्टचा स्वतंत्रपणे पर्सेंटाइल काढला जातो. त्यानंतर या सर्व पर्सेंटाइलचे नॉर्मलायझेशन केले जाते. सध्या सीईटी सेलकडून प्रत्येक शिफ्टचा पर्सेंटाइल जाहीर केला जात नाही. तो करण्याची मागणी पालकांकडून होत आहे. त्यामुळे निकालात पारदर्शकता येईल आणि विद्यार्थ्यांनाही गुणांबाबत अवास्तव अपेक्षा होणार नाहीत, असे एक पालक म्हणाले.
फेरतपासणी करण्याची ठाकरे यांची मागणीआन्सर कि आणि मिळालेल्या पर्सेंटाइलमधील तफावतीबाबत विद्यार्थी-पालकांनी उद्धवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी ठाकरे यांची भेट घेत यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. पालकांच्या तक्रारीवरून ठाकरे यांनी राज्याच्या सीईटी सेलला पत्र लिहून आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना ई-मेल करून निकालाच्या फेरतपासणीची मागणी केली आहे.