लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत पॉलिटेक्निक पदवी प्रवेशाची अर्ज प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत यासाठी १ लाख ५५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील सव्वा लाख विद्यार्थ्यांनी संपूर्ण शुल्क भरून अर्जाची निश्चितीही केली आहे. दरम्यान, १३ ऑगस्ट रोजी अर्ज निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी अलॉटमेंटचे पुढील वेळापत्रक जाहीर होणार आहे.
२०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पॉलिटेक्निक प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यातील ३६४ पॉलिटेक्निक महाविद्यालयांची प्रवेश क्षमता १,०१,२२४ असून त्यासाठी आतापर्यंत १ लाख ५५ हजार अर्ज नोंदणी झाली आहे.
पॉलिटेक्निक प्रवेशासाठी करण्यात येणाऱ्या अर्ज नोंदणीची मुदत संपल्याने त्यात आणखी एका आठवड्याची वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना येत्या ११ ऑगस्टपर्यंत प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या अर्जनोंदणीत निश्चित आणखी काही हजारांची भर पडणार असल्याचा विश्वास संचालनालयाकडून व्यक्त होत आहे.
पॉलिटेक्निककडे कल का?विद्यार्थ्यांचा पदविका अभ्यासक्रमांकडे वाढणार कल, औद्योगिक क्षेत्राच्या गरजेनुसार पॉलिटेक्निक अभ्यासक्रमामध्ये करण्यात येणारे बदल, शिक्षकांचे वेळोवेळी होणारे प्रशिक्षण, शिवाय उद्योग व्यावसायिक संस्था आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित संस्थांशी आवश्यक करार व संवाद यामुळे पॉलिटेक्निक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची अर्जनोंदणी आणि प्रत्यक्ष प्रवेश वाढत आहेत.