लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विभागात अकरावी प्रवेशासाठी एकूण तीन लाख २० हजार ७१० जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी पहिल्या फेरीसाठी एक लाख ९१ हजार ९३ जागा उपलब्ध झाल्या असून, त्यातील एक लाख १७ हजार ८८३ जागांवर विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली आहे.
पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४८ हजार ७८८ असून, दुसऱ्या पसंतीचे महाविद्यालय १८ हजार ८०४ विद्यार्थ्यांना प्राप्त झाले. तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय बारा हजार ७९९ विद्यार्थ्यांना मिळाले. पहिल्या फेरीत अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एक लाख पाच हजार ८६८ विद्यार्थी राज्य मंडळाचे आहेत. तसेच ८६ हजार १०९ विद्यार्थी खुल्या प्रवर्गातील आहेत.
अलॉट झालेल्या जागांमध्ये विज्ञान शाखेच्या ४० हजार ३५४, कला शाखेच्या ११ हजार ७६८ आणि वाणिज्य शाखेच्या ६५ हजार ०२८ जागांचा समावेश आहे. एचएसव्हीसीच्या ७३३ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्यांमध्ये विज्ञान शाखेच्या १९ हजार १०६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. वाणिज्य शाखेच्या २२ हजार ६०० आणि कला शाखेच्या सहा हजार ३९८ विद्यार्थ्यांना पसंतीचे पहिल्या क्रमांकाचे महाविद्यालय प्राप्त झाले आहे. पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये प्रवेश मिळालेल्या मुलांची संख्या ५६ हजार ६१३, तर मुलींची संख्या ६१ हजार २६९ आहे.
पहिल्या गुणवत्ता यादीत सीबीएसई मंडळाच्या तीन हजार ८१०, आयसीएसई मंडळाच्या सात हजार १६७, आयबी मंडळाच्या पाच, आयजीसीएसई मंडळाच्या ५७१, एनआयओएस मंडळाच्या १६४ व इतर मंडळाच्या २९८ जागा अलॉट झाल्या. इडब्ल्यूएससाठी १४ हजार ४४६ जागा असून, पहिल्या फेरीत २८१ अर्ज आले, त्यातील २७३ जागा अलॉट झाल्या.
प्रवेश बंधनकारकपहिला पसंतीक्रम मिळालेल्या विद्यार्थ्याने निवडलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे. जर प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही अथवा नाकारला तर अशा विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेऱ्यांमध्ये संधी दिली जाणार नाही. त्यांना विशेष फेरीपर्यंत थांबावे लागणार आहे. हे प्रवेश २७ ऑगस्ट ते ३० ऑगस्टच्या दरम्यान घेणे बंधनकारक आहे.