लखनऊ : कोरोना साथीच्या काळात शाळा बंद असल्याने ऑनलाइनशिक्षण घेत असलेल्या इयत्ता चौथी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांपैकी ५५ टक्के विद्यार्थ्यांचे आरोग्य बिघडले आहे. त्यांना निद्रानाश, दृष्टीदोष व तणाव या आजारांचा सामना करावा लागत आहे.उत्तर प्रदेशातील लखनऊच्या एका शिक्षणसंस्थेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या एका सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला.
कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणाचे जे परिणाम झाले त्याचा मागोवा या सर्वेक्षणात घेण्यात आला. त्यामध्ये ४,४५४ जण सहभागी झाले. त्यात ३,३०० विद्यार्थी, १००० पालक व १५४ शिक्षकांचा समावेश होता. ऑनलाइन शिक्षणाचे फायदे व तोटे याबद्दल या सर्वांची मते जाणून घेण्यात आली.५४ ते ५८ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले की, ऑनलाइन शिक्षण घेताना त्यांना दृष्टीदोष, पाठदुखी, डोकेदुखी अशा काही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्याशिवाय सतत एकाच जागी बसल्यामुळे स्थूलपणा, सुस्ती, चिडचिड, थकवा या गोष्टीही वाढीस लागल्या आहेत.
सुमारे ५० टक्के विद्यार्थ्यांना तणाव तर २२ टक्के विद्यार्थ्यांना निद्रानाशाचा त्रास सुरू झाला आहे. तर ४५ ते ४७ टक्के जणांना शिक्षकांशी व सहाध्यायींशी संवाद साधण्यात अडचण येत आहे. वर्गातील सर्व मुले स्क्रीनवर दिसत नाहीत अशी तक्रारही काही जणांनी केली.ऑनलाइन शिक्षण घेत असताना काही विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास तसेच शिकण्याची प्रेरणा कमी झाल्याचे दिसून आले आहे. शिक्षक व विद्यार्थी हे दोघेही तंत्रज्ञानस्नेही झाले आहेत. ऑनलाइन शिक्षणामुळे अधिकचा मोकळा वेळ मिळत असल्याचे काही मुलांनी सांगितले. या फावल्या वेळात ते बागकाम करतात तसेच हस्तकला आदी गोष्टी शिकत आहेत. ६५ टक्के मुलांनी आपण मोकळा वेळ घरच्या मंडळींसमवेत घालवत असल्याचे सांगितले.
शाळेची ओढशिक्षक, विद्यार्थी शाळेत येण्यासाठी अधीरबहुतांश विद्यार्थी, शिक्षकांना पूर्वीसारखे शाळेत येऊन आपला दिनक्रम सुरू करायचा आहे. ऑनलाइन शिक्षणाचे काही फायदे असले तरी प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहून शिकण्यावर व शिकविण्यावर अनुक्रमे विद्यार्थी व शिक्षकांचा अधिक विश्वास आहे. त्यामुळे ते शाळेत येण्यास अधीर झाले आहेत असेही या सर्वेक्षणातील निष्कर्षांतून दिसून आले.