सर्वांगीण प्रगतीसाठी मनुष्याला समाजात सर्जनशील कौशल्यांबरोबरच संवाद कौशल्य आणि तर्क कौशल्याची गरज असते. आदर्श शिकणे म्हणजेच मजबूत शैक्षणिक पाया निर्माण करणे होय. ज्याचा वापर करून वेळोवेळी जी-जी नवीन कौशल्ये जीवनात आवश्यक पडतील ती, त्या-त्या वेळी अतिशय कमी वेळात व प्रभावीपणे आत्मसात करता येतील.
सर्वसाधारणपणे लोकांचा असा समज असतो की, शिकणे ही संकल्पना फक्त शाळा कॉलेज यांच्या संबंधितच असते. परंतू, व्यापक दृष्टिकोनातून पहिले तर, जसे कॉलेजमध्ये आपण शिकतो. तसेच विविध आयोजित केलेली चर्चासत्रे, वाचनकट्टा, समविचारी लोकांशी केलेले विचारमंथन,ग्रुपमध्ये काम करताना इतरांची कार्यकौशल्य पाहूनही आपण शिकत असतो. समाजात वावरताना किंवा काम करताना जास्तीत जास्त प्रकारची कौशल्ये जो सजगपणे आत्मसात करतो. त्याचे शिकणे हे जास्त प्रगतिशील घडते.
काही नामांकित विद्यापीठांमध्ये झालेल्या संशोधनातून शिकणे ही प्रक्रिया भविष्यात पाच प्रकारात रुपांतरित होत जाईल,असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
पहिला रुपांतर प्रकार ''कन्टेन्ट सर्वत्र : पारंपरिक व्याख्येनुसार,आपल्याकडे ही कल्पना आहे. शिकणे हे अधिकृत चाकोरीबद्ध आखलेल्या अभ्यासक्रमात असावे,जे मिळवण्यासाठी एखाद्या शाळा किंवा कॉलेजच्या वर्गात बसावे लागते. परंतू,बदलत्या काळानुसार ज्ञानाचे श्रोत सर्वत्र उपलब्ध आहेत. म्हणजेच डिजिटल माध्यमातून ज्ञानाचे विविध श्रोत अतिशय सहजपणे उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे आता दुसऱ्या कोणीतरी तुम्ही काय शिकावे? हे सांगितलेल्या चौकटीपेक्षा तुम्हाला काय शिकण्यात स्वारस्य आहे, यावर तुम्ही शिकण्यात गुंतू शकाल.
दुसरा रुपांतर प्रकार ‘शिक्षक सर्वत्र’: भविष्यातील डिजिटल संस्कृतीचा विकास पाहता केवळ वर्गातील शिक्षकांवर अवलंबून न राहता तुमच्या शिक्षणाला सक्षम आणि समर्थन देण्यासाठी आवश्यक कौशल्य कोठे आहे, यावर जास्त भर दिला जाणार आहे. मग ते ज्ञान वर्गातील शिक्षक किंवा मेन्टॉरकडून मिळण्याबरोबरच तुमच्या विचारांना चालना देणाऱ्या ज्ञानाच्या विविध डिजिटल स्त्रोतांच्या संग्रहातून देखील मिळू शकेल.
तिसरा प्रकार म्हणजे भविष्यातील शिकण्याची प्रक्रिया जास्त वैयक्तिकृत होणार आहे. वर्गातील प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळ्या कौटुंबीक पार्श्वभूमीतून आलेला असतो. तसेच प्रत्येकाची आवड, बौद्धिक पातळी देखील वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाची ज्ञानग्रहण पातळी विभिन्न असते. भविष्यात, शिक्षणाच्या स्त्रोतांच्या विस्तृत वितरणामुळे शिक्षण अधिक वैयक्तिकृत होईल.
चौथा प्रकार म्हणजे ''नेटवर्क म्हणजेच नवीन वर्गखोली'' ही संकल्पना. सध्या प्रत्येक वर्गात एक शिक्षक ज्ञानाचा स्रोत बनून मुलांना शिकवतो. परंतू, भविष्यात हीच शिक्षण प्रक्रिया वर्गापर्यंत मर्यादित न राहता समाजात पसरणार आहे. समविचारी लोकांचे ग्रुप, विविध कौशल्य जाणकार अशा तज्ज्ञ लोकांचे एक नेटवर्कच मुलांना २४ तास उपलब्ध असेल. ज्यायोगे मुलांना त्यांच्या आवडीचे विषय सवडीच्या वेळेत शिकता येतील.
पाचवा रुपांतर प्रकार म्हणजे ‘लर्निंग इज एव्हरीवेअर’ सध्याचे पारंपरिक शिकणे हे शाळा कॉलेजच्या वर्गांमध्ये घडते. परंतू, भविष्यात या भिंती संपून समाजातील विविध ठिकाणी सवडीनुसार शिकणे सुरू होईल. कॉफी शॉप,लायब्ररी,डिजिटल कम्युनिटी यासारख्या ठिकाणी शिकणे सुरू होईल. आता हे रुपांतर भविष्यात कधी होईल, कशा प्रमाणात होईल. पारंपरिक शिक्षण व्यवस्था ते कसे स्वीकारेल याची उत्तरे आज सांगणे कठीण आहे. पण एवढा निष्कर्ष नक्की काढता येतो की, भविष्यातील मानवाच्या जीवनात वाढणारा तंत्रज्ञानांचा शिरकाव आणि इंडस्ट्री ४. ० चा विस्तार यामुळे सतत नवनवीन स्किल्स शिकत राहणे हे गरजेचेच होणार आहे.
ज्यावेळी वर्गातील पारंपरिक शिक्षण आणि इंडस्ट्रीला लागणारी कौशल्ये यातील दरी वाढत जाईल. तसेच नुसती पदवी मिळवून रोजगाराभिमुखता येणे कमी होईल, तसतसे हे रुपांतरण विद्यार्थ्यांनाच गरजेचे वाटू लागेल, असा देखील निष्कर्ष विचारवंतांनी संशोधनातून काढला आहे. या सर्व गोष्टींचा म्हणजे विद्यार्थ्यांनी नुसते पदवी मिळवण्यासाठी न शिकता सजगपणे आपल्या आवडीनुसार उपलब्ध डिजिटल माहिती स्रोतांमधून निरनिराळी कौशल्ये देखील पदवी अभ्यासक्रम शिकताना आत्मसात करावीत. प्रत्येकाने आता लर्निंग लीडर बनण्याचा प्रयत्न करायला हवा.
- दीपक हर्डीकर, चिफ एज्यूकेशन टेक्नॉलॉजी ऑफिसर, एसपीपीयू-एज्यूटेक फांऊडेशन