लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सीईटी सेलकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर आता २०२१-२२ करिता सीईटी सेलकडून तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या बीई, बीटेक, बीएचएमसीटी आणि डीएसई (थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी) या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेला दोन नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. तसेच डीएसपी (थेट द्वितीय वर्ष औषधनिर्माणशास्त्र), बॅचलर इन आर्किटेक्चर या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसाठी तीन नोव्हेंबरपासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. अभ्यासक्रमानुसार वेळापत्रक www.mahacet.org येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे.
राज्यातील शासकीय, अनुदानित, विद्यापीठांशी संलग्न संस्था आणि विभाग, तसेच विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांमधील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या (बी.ई आणि बी.टेक) प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १८ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेतील सर्वसाधारण गुणवत्ता यादी २२ नोव्हेंबर, तर अंतिम गुणवत्ता यादी २७ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेंतर्गत दोन प्रवेश फेऱ्या होतील. प्रवेशाच्या २ फेऱ्यांनंतर १५ ते २२ डिसेंबरदरम्यान महाविद्यालयांना रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानंतरच ६ डिसेंबर रोजी महाविद्यालयांना त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाला सुरुवात करता येणार आहे.
अशी असेल प्रक्रियाऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रे अपलोड करणे : १८ नोव्हेंबर (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)कागदपत्रे पडताळणी, अर्ज निश्चिती, ई-स्क्रुटनी किंवा प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन स्क्रुटनी करणे : २० नोव्हेंबर (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करणे : २२ नोव्हेंबरसर्वसाधारण तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर हरकती, आक्षेप नोंदविण्यासाठी कालावधी : २३ ते २५ नोव्हेंबर । अंतिम गुणवत्ता यादी जाहीर : २७ नोव्हेंबरप्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे : २७ नोव्हेंबर
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी निकालानंतर लगेचच प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी प्रक्रियेनुसार अर्जनोंदणी वेळेत करून आपापले प्रवेश निश्चित करावेत. कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास संकेतस्थळावरील सीईटी कक्षाच्या पत्त्यावर विद्यार्थी ईमेल करू शकतात, अथवा समस्या सांगू शकणार आहेत. - रवींद्र जगताप, आयुक्त, सीईटी सेल