लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशाचे पंतप्रधान कोण, आजची तारीख काय, तुम्ही काय सेवा देऊ शकता, असे प्रश्न विचारल्यावर तुमच्या प्रश्नांना नेटकी उत्तरे देणारा आणि ९० टक्के स्वदेशी बनावटीचा इंद्रो ह्युमनॉइड आयआयटी टेकफेस्टच्या पहिल्या दिवशीचे आकर्षण ठरला. सध्या इंग्रजी भाषेत संवाद साधणार इंद्रो लवकरच मराठी आणि हिंदी भाषेतही आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊन संवाद साधू शकणार आहे. इंद्रोचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याची उंची ५.९ फूट इतकी असून देशात निर्मिती केलेला सर्वांत उंच ह्युमनॉइड म्हणून हा ओळखला जातो. संतोष हुलावळे यांनी त्याची निर्मिती केली आहे.
यंदाच्या आयआयटी टेक फेस्टला शुक्रवारी मोठया दिमाखात सुरुवात झाली. आयआयटी मुंबईच्या टेक फेस्टचे यंदाचे २६ वे वर्ष आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आतापर्यंतची विशेष राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधने इंटरनॅशनल प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.
इंद्रोमध्ये निर्धारित माहिती भरल्यानंतर तो कोणत्याही संस्थेतील व्यक्तींना प्रशिक्षण देण्यापासून ते त्यांच्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यास कार्यक्षम आहे. एखाद्या ह्युमनॉइडमध्ये जितके जास्त जॉईंट ॲक्सेस असतात तितका तो अधिक कार्यक्षम असतो, इंद्रोमध्ये २८ कँजॉईन्ट ॲक्सेस आहेत. तो त्याच्या आधीच्या प्रकारांपेक्षा अधिक कार्यक्षम असून यामुळे तो मानवी हालचालींप्रमाणे काम करू शकत असल्याची माहिती संतोष हुलावळे यांनी दिली.
देशभरात कार्यान्वित सेन्सर्स, कॅमेरा, कंट्रोलर यांचं साहाय्याने सूचनांप्रमाणे कार्य करण्यासाठी प्रशिक्षित असल्याने हा ह्युमनॉइड आतापर्यन्त देशातल्या विविध शाळा महाविद्यालयातही कार्यन्वित आहे. शिक्षकांच्या सूचनांनुसार, विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्न ,शंका सोडविण्यासाठी मदत करत आहे. त्याचप्रमाणे मॉल, रेस्टॉरंट्स अशा ठिकाणी ही याची मदत होत आहे. नाशिक, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी आतापर्यंत इंद्रो पोहोचला आहे. पुढील एका महिन्यात आर्टिफिशिअल इंटेलिजिन्सवर आधारित इंद्रोचा पुढील टप्पा लवकरच खुला करण्यात येईल, असे संतुष्ट हुलावळे यांनी स्पष्ट केले.