मुंबई :
घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात वारंवार पत्रसंवाद व्हायचा. उभयतांमध्ये प्रगाढ मैत्रीही होती. शाहू महाराजांनी आंबेडकरांची मुंबईतील निवासस्थानी घेतलेली भेट आणि माणगाव परिषदेत आंबेडकरांचा शाहू महाराजांनी केलेला सन्मान या सर्व पार्श्वभूमीवर या दोन्ही महनीय व्यक्तींबाबत संशोधन होणे गरजेचे असून, दोन्ही विद्यापीठे हे काम संयुक्तरीत्या करतील, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी दिली.
मुंबई विद्यापीठामध्ये ८ ते १४ एप्रिलदरम्यान महात्मा जोतिराव फुले व बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने उभयतांवरील दुर्मीळ पुस्तकांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने बोलताना कुलगुरूंनी वरील माहिती दिली. मुंबई विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र व शिवाजी विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र यांच्यात संयुक्तरीत्या विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतील, असेही कुलगुरूंनी नमूद केले.
ग्रंथप्रदर्शनात ४०० हून अधिक पुस्तके, दुर्मीळ लेख, साहित्य, महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा, रविवार, ३ एप्रिल १९२७ चा बहिष्कृत भारत पाक्षिकाचा पहिला अंक, मूकनायक, जनता साप्ताहिकाचे ऑक्टोबर १९५६ चे हिरक महोत्सवी विशेषांक, एन्साक्लोपीडिया ऑन आंबेडकर, आंबेडकर ऑन पॉप्युलेशन पॉलिसी, चॅम्पियन ऑफ ह्युमन राइट्स, एन्साक्लोपीडिया ऑफ दलित एथनॉग्राफी, द आंबेडकर एरा, महात्मा फुले गौरवग्रंथ अशा विविध ग्रंथांचा समावेश आहे. सांताक्रूझ पूर्व येथील मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरीतील पंडित जवाहरलाल नेहरू ग्रंथालयात सकाळी १० ते दुपारी ५ या वेळेत सात दिवस चालणारे हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.