नवी दिल्ली – रशिया-यूक्रेन यांच्यातील युद्ध निर्णायक टप्प्यात आलं आहे. दरदिवशी लाखो लोकं यूक्रेन सोडत आहेत. संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार, जेव्हापासून या युद्धाला सुरूवात झाली आहे तेव्हापासून आजतागायत १० लाखाहून अधिक लोकांनी यूक्रेन सोडलं आहे. त्याठिकाणाहून मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी बाहेर पडत आहेत. यूक्रेनमध्ये जवळपास १८ हजार भारतीय राहतात. त्यातील सर्वाधिक मेडिकल शिक्षणासाठी गेलेले आहेत. यूक्रेनमधील भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरू आहे. मात्र अद्यापही अनेक भारतीय यूक्रेनमध्ये अडकले आहेत.
इतक्या मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी मेडिकल शिक्षणासाठी यूक्रेनला का जातात? असा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. त्याचं उत्तर आहे कमी फी, यूक्रेनमध्ये MBBS च्या ५-६ वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी ३५ ते ४० लाख रुपये खर्च येतो. त्यात राहण्याचा खर्चही समाविष्ट आहे. तर भारतात मॅनजमेंट कोटा सीटच्या फीसाठी ३० ते ७० लाख रुपये खर्च होतो. परंतु परदेशातून आल्यानंतर भारतात कुणाला प्रॅक्टिस करायची असेल तर त्याला परीक्षा देणं गरजेचे असते. ही परीक्षा दिल्याशिवाय परवाना मिळत नाही. त्याला फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स एग्जामिनेशन(FMGE) म्हटलं जातं. परंतु परदेशातून आलेले बहुतांश विद्यार्थी ही परीक्षा यशस्वी होत नाहीत.
FMGE ची परीक्षा घेणारे नॅशनल बोर्ड ऑफ एग्जामिनेशननुसार, २०२० मध्ये परदेशातून आलेल्या ३५ हजार ७७४ जणांनी ही परीक्षा दिली. त्यातील केवळ ५ हजार ८९७ जण म्हणजे १६.४८ टक्के पास झाले. मागील ६ वर्षापासूनचे आकडे पाहिले तर १.२६ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलीय. त्यातील २१ हजार विद्यार्थी पास झाले आहेत. परंतु परदेशातून शिक्षण घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. २०१५ मध्ये १२,१२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तर २०२० मध्ये ३५ हजार ७७४ विद्यार्थी परीक्षा दिली. म्हणजे ६ वर्षात परदेशातून शिक्षण घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३ पटीनं वाढली आहे. तर यूक्रेनमधून शिक्षण घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट झाली आहे.
भारतात MBBS च्या जागा ८८ हजार, तर NEET परीक्षा देणाऱ्यांची संख्या १५ लाख
डिसेंबर २०२१ मध्ये आरोग्य मंत्रालयानं लोकसभेत सांगितले की, देशात ५९६ मेडिकल कॉलेज आहेत. ज्यात MBBS च्या जागा ८८ हजार १२० आहेत. यातील अर्ध्या जागा खासगी कॉलेजमध्ये आहेत. मागील ७ वर्षात देशात मेडिकल कॉलेजची संख्या १७४ ने वाढली आहे. MBBS च्या जागा ३० हजार ९८२ नं वाढल्या आहेत. परंतु मेडिकल शिक्षणासाठी द्यावी लागणारी NEET परीक्षेत दरवर्षी १५ लाख विद्यार्थी बसतात. २०२१ मध्ये १६.१४ लाख विद्यार्थ्यांनी NEET परीक्षेचा अर्ज दिला होता. ज्यातील १५.४४ लाख विद्यार्थी परीक्षेत बसले आणि ८.७० लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा पास केली होती. NEET परीक्षा पात्रतेसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कमीत कमी ५० टक्के गुण आवश्यक असतात. तर SC/ST आणि OBC विद्यार्थ्यांसाठी ४० टक्के गुण आवश्यक आहेत. तर PWD प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पात्रतेसाठी ४५ टक्के गुण आवश्यक आहेत.