मुंबई : जेईई मुख्य परीक्षेचा मार्च सेशनचा अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल एनटीए म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून जाहीर करण्यात आला असून देशातील तब्बल १३ विद्यार्थ्यांना यामध्ये १०० पर्सेँटाइल मिळाले. ही संख्या फेब्रुवारी सत्राच्या निकालापेक्षा दुप्पट आहे. यावेळी १०० पर्सेँटाइल स्कोअर करणाऱ्या १३ विद्यार्थ्यांपैकी अथर्व अभिजीत तांबट आणि गार्गी मार्कंट बक्शी हे दाेघे महाराष्ट्रातील आहेत. यात दिल्लीच्या सिद्धार्थ कालरा, काव्या चोप्रा, तेलंगणाच्या बन्नूरू रोहित कुमार रेड्डी, मदुर आदर्श रेड्डी आणि जोसयुला व्यंकट आदित्य, पश्चिम बंगालच्या ब्रतिन मंडल, बिहारच्या कुमार सत्यदर्शी, राजस्थानच्या मृदुल अग्रवाल, जेनिथ मल्होत्रा आणि तमिळनाडूच्या अश्विन अब्राहम यांचाही समावेश आहे.
मार्च महिन्यातील परीक्षा एनटीएने १६ ते १८ मार्च २०२१ या कालावधीत आयोजित केली होती. सध्या पेपर-१ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात एकूण ६,१९,६३८ उमेदवार सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून १०० पर्सेँटाइल मिळविणारा अथर्व अभिजीत तांबट हा नवी मुंबईचा आहे, गार्गी मार्कंट बक्शीची मुंबईच्या आयआयटीमध्ये कॉम्प्युटर सायन्समध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे. गार्गी दादर येथील पेस कनिष्ठ महाविद्यालयात ती शिक्षण घेत असून ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी बरीच तयारी करून घेतल्याचे गार्गीच्या वडिलांनी सांगितले. दरम्यान, जेईई-मेन परीक्षा या वर्षी ४ सेशनमध्ये होणार असून यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च सेशनमधील परीक्षा पूर्ण होऊन त्यांचे निकालही जाहीर झाले आहेत. या चारही परीक्षेतील गुणांच्या आधारावर अंतिम निकाल देण्यात येईल. ही परीक्षा १३ भाषांमध्ये (इंग्रजी, हिंदी, गुजराती, आसामी, बंगाली, कन्नड, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू) घेण्यात आली.
'मुलाच्या यशाचा सार्थ अभिमान' अथर्व अभिजित तांबट यालाही १०० पर्सेँटाइल मिळाले असून त्याला ३०० पैकी ३०० गुण मिळाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल आई वडिलांना त्याचा आई वडिलांनी मुलाचा अभिमान वाटत असल्याची वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली. नवी मुंबईच्या सानपाडा येथील रायन इंटरनॅशनल मधून शिक्षण घेतलेल्या अथर्वने दहावीनंतरच जेईईची तयारी करण्यास सुरुवात केली. आता जेईई ऍडव्हान्ससाठीची त्याची तयारी जोरात सुरु आहे. कोरोनाकाळात त्याने मन लावून अभ्यास केला. व्यवस्थित नियोजनामुळे त्याला भीती वाटली नसल्याची माहिती अथर्वच्या वडिलांनी दिली. पुढे त्याला आयआयटी मुंबईमध्ये कॉम्प्युटर विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचे ध्येय त्याने समोर ठेवले आहे.