बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल नेमका कसा लावणार? त्यासाठीचे निकष कोणते? याची माहिती येत्या दोन आठवड्यांमध्ये सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाला दिले आहेत. सुप्रीम कोर्टात बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासंबंधी अॅड. ममता शर्मा यांच्या याचिकेवर पार पडली. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी देशातील आणि परदेशातील अभ्यासक्रमांचे प्रवेश महच्वाचे आहेत. तुम्ही तातडीनं निर्णय घ्या, गरज पडल्यास दररोज ऑनलाईन मिटिंग घ्या पण दोन आठवड्यामध्ये निर्णय जाहीर करा, असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे.
दरम्यान, देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन परीक्षा न घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं कोर्टानं स्वागत देखील केलं. पण यापुढील नियोजन तातडीनं करण्याचा महत्वाचा सल्ला कोर्टानं दिला आहे.
सीबीएसईच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णायाबाबात अॅड. ममता शर्मा यांनी याचिका दाखल केली आहे. ही याचिका रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारकडून अॅटर्नी जनरल के.के.वेणुगोपाल यांनी केली. त्यावर सुप्रीम कोर्टानं आधी बारावीचा निकाल कसा आणि कोणत्या निषकांवर लावणार हे निश्चित करा, त्याची माहिती कोर्टाला द्या असं केंद्राला सांगितलं आहे.
आयसीएसईच्या वकिलांनी यासाठी ४ आठवड्यांची वेळ मागितली. सुप्रीम कोर्टानं केंद्राची बाजू आणि आयसीएसईची बाजू ऐकून घेत अखेर २ आठवड्यांची मुदत दिली आहे. तुमची इच्छा असेल तर हे एका रात्रीत करु शकता. मात्र, दोन आठवड्यामध्ये निकालाचे निकष जाहीर करा. वेळ वाढवून देण्यासाठी युक्तिवाद करु नका, असं न्यायाधीशांनी रोखठोक भूमिका घेत सांगितलं आहे.