मुंबई – कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची प्रचंड गैरसोय झाल्याचं पाहायला मिळालं. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालं. मात्र आता हळूहूळू अनेक शाळा सुरु होत आहेत. विद्यार्थी पुन्हा शाळेत जाऊ लागले आहेत. शिक्षकांनी फळ्यावर विद्यार्थ्यांना धडे शिकवायला सुरु केलेत. कोरोनामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात बरेच अंतर आले होते. आता कोरोना नियंत्रणात आल्यानं परिस्थिती सुधारु लागली आहे.
त्यात आता दिवाळी आल्याने विद्यार्थ्यांना सुट्टीचे वेध लागले होते. याबाबत राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. शासनानं परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना १४ दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. शासनाच्या परिपत्रकात म्हटलंय की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ग्रामीण आणि शहरी शाळा ४ ऑक्टोबरपासून ऑफलाईन स्वरुपात सुरू झाल्या आहेत. राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना सण-उत्सवाकरिता सुट्ट्या घोषित करण्यात येत असतात.
त्याप्रमाणे सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात दिवाळी सणानिमित्त शाळांना २८ ऑक्टोबर २०२१ ते १० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत सुट्टी घोषित करण्यात येत आहे. या कालावधीत शाळामार्फत घेण्यात येणारे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सुरु असलेले अध्यापन कामकाज बंद राहील. याबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरुन परिपत्रक शेअर करत माहिती दिली आहे.
वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२१ दरम्यान दिवाळी सणाची सुट्टी असेल. या कालावधीत शाळांकडून सुरू असलेले ऑनलाइन अध्यापनही बंद राहील. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा अशा सदिच्छा त्यांनी दिल्या आहेत.
दिवाळीनंतर पहिलीपासून विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु होणार?
कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणा आल्यानंतर राज्यात ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु झाले असून राज्यातील महाविद्यालयांनाही काही दिवसांपूर्वी कोरोनाचे नियम पाळत सुरु करण्याची परवानगी दिली आहे. यानंतर आता राज्यात सरसकट पहिलीपासून शाळा सुरू करण्याबाबत हालचाली सुरु झाल्याची माहिती समोर आली होती. पहिली ते चौथी शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी सकारात्मक असल्याचं समोर आलं आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ४ दिवसांपूर्वी सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठक घेतली. या बैठकीत वर्षा गायकवाड यांनी राज्यातील सुरू असलेल्या शाळांबाबतचा आढावा घेतला. राज्यात शाळा सुरू होऊन ३ आठवडे झाले आहेत. या तीन आठवड्याचा अनुभव लक्षात घेता राज्यात पहिली ते चौथीच्या शाळा सुरू कराव्यात अशी भूमिका राज्यातील बहुतांश जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मांडली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीनंतर राज्यात पहिली ते चौथी शाळा सुरु होणार का? या निर्णयाकडे पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.