- विवेक म्हस्केविवंचनेत असलेल्या प्रश्नांना उत्तरं मिळण्याचं हक्काचं बोलकं व्यासपीठ, म्हणजे शाळेतील मधली सुट्टी... आधीचे तास पूर्ण होईपर्यंत घडाळ्याच्या काट्याकडे सर्वांच्याच नजरा लागून असायच्या. ‘घंटा’ वाजण्याच्या आत, सारं काही उरकून बसायचं आणि एकदाची ‘घंटा’ वाजली की, सारे सवंगडी क्षणार्धात ठरलेल्या रोजच्या ठिकाणी जमा व्हायचे. शाळेत मिळणाऱ्या भाताची एक वेगळीच मजा होती. भात घेण्यासाठी एका सरळ रांगेत, शिस्त न मोडता उभं राहायचं. मग रिंगण करून सर्वांसोबत, गप्पा आणि अनेक किस्से सांगत जेवण करायचं. तेव्हा या जगात आपण किती हरवलो होतो, हे आज कळलं. नव्याने सुरू झालेल्या शाळेत सहज गेलो असता, पुन्हा बालपण जागं झालं.
नुकतीच मधली सुट्टी होऊन मुले जेवणासाठी जमली होती. त्यांच्या किलबिलत्या घोळक्यात चाललेली प्रत्येक गोष्ट कटाक्षाने मी टिपत होतो. बघता बघता मी त्यात कधी रमून गेलो, कळलंही नाही.
खरं तर शाळेतली मधली सुट्टी ही जेवणासाठी असायची. मात्र, त्या वेळामध्ये आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी जगल्याचा आणि जपल्याचा आनंद अजून माझ्या मनाशी आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे सारंच जग विस्कळीत झालं होतं. आता परिस्थिती निवळताच सुटकेचा निःश्वास घेत, शाळांना पुन्हा जिवंतपणा आला आहे. रिकाम्या भकास वर्गखोल्या, मोकळ्या भिंती, बंद दरवाजे... सारं ओसाड असल्यासारखं रूप शाळांना आलं होतं. खूप खूप दिवसांनी पाठीवर दप्तर घेऊन, मुलांनी शाळेची वाट धरली आहे. मोबाईलमध्ये गुंतलेली डोकी आता भिंतीवरील फळ्यांकडे वळली आहेत. शाळेतील प्रार्थना, राष्ट्रगीताने परिसरात पुन्हा चैतन्य निर्माण होत आहे. पुस्तकं चाळून कविता, गाण्यांचं पाठांतर आता पुन्हा मुलांच्या ओठांवर खेळू लागणार, याचा आनंद आहे.
वास्तव जीवनाशी जुळवून घेण्याची कितीतरी कौशल्ये शाळेतच तर मिळतात! आता मोबाईलला सुट्टी देत मुलांनी शाळेची वाट धरत तोच उत्साह कायम ठेवला आहे. मुलांच्या विकासासाठी शाळा चालू होणं फार फार महत्त्वाचं होतं. शाळा पुन्हा एकदा किलबिलू लागल्या आहेत. देवा, या सुंदर देखण्या चित्राला पुन्हा त्या कोरोनाची नजर लागू देऊ नकोस!